Mhada Lottery : दिवाळीत निघणाऱ्या म्हाडाच्या लॉटरीबाबत महत्त्वाची अपडेट!
म्हाडाच्या दिवाळीत निघणाऱ्या लॉटरीची तुम्हीही वाट बघताय? मग ही बातमी तुमच्यासाठी!

ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई : गृहस्वप्न साकार करण्यासाठी म्हाडा लॉटरी 2022 च्या (MHADA Lottery 2022) प्रतिक्षेत तुम्ही असाल, तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. चार हजार घरांसाठी म्हाडाची लॉटरी दिवाळीत (Diwali Mhada Lottery) निघण्याची शक्यता होती. मात्र ही शक्यता आता जवळपासून धुसर झाली आहे. दिवाळीमध्ये म्हाडा लॉटरी निघणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. म्हाडाच्या लॉटरीच्या सॉफ्टवेअरचं (Mhada Lottery Software) काम सध्या सुरु आहे. हे काम अंतिम टप्प्यात असलं तरी अद्याप पूर्ण झालेलं नाही. त्यामुळे दिवाळीत सुरु होणारी लॉटरीची प्रक्रिया यंदा पुढे ढकलण्यात आलीय.
म्हाडाची लॉटरी पुढे ढकलण्यात आल्यानं सर्वसामान्यांना आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. दरवर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर निघणाऱ्या म्हाडा लॉटरीच्या प्रक्रियेलाही यंदा फटका बसलाय. त्यामुळे इच्छुक ग्राहकांचाही हिरमोड झालाय. दरम्यान, आता 4 हजार म्हाडाच्या घरांची लॉटरी केव्हा निघते, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.
पाहा व्हिडीओ :
म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची सोडत आता केव्हा निघणार, याबाबत लवकरच म्हाडाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती जारी करण्यात येईल. चार हजार घरांच्या सोडतीची जाहिरातही लवकरच काढली जाईल, असा विश्वासही व्यक्त केला जातोय. सॉफ्टवेअरचं काम पूर्ण झालं, ही सोडत प्रक्रियेला सुरुवात केली जाणार आहे, असं सांगितलं जातंय.
सॉफ्टवेअरमध्ये बदल
दरम्यान, नव्या सॉफ्टवेअर प्रणाली प्रमाणे आता म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज भरताना काही बदलही करण्यात येणार आहेत. फ्रि प्रेस जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, आता म्हाडाच्या लॉटरीसाठी फॉर्म भरताना काही कागदपत्रांची पूर्तता थोडी अर्ज भरणाऱ्यांना आधीच करावी लागणार आहे.
याआधी लॉटरी लागल्यानंतर ज्या कागदपत्रांची पूर्तता लोकांना करावी लागत होती, ती कागदपत्रही लॉटरीचा फॉर्म भरतानाच मागवून घेतली जाणार आहेत. त्या धर्तीवरच अर्ज भरलेल्यांचे फॉर्म स्वीकारले किंवा नाकारले जातील.
ऑनलाईन फॉर्म भरताना ओळखपत्र, पत्ता, उत्त्पन्नाचे कागदोपत्री पुरावे, जात प्रमाणपत्र, ज्या वर्गातून अर्ज भरावयाचा आहे, त्या विशेष प्रभागाचं सर्टिफिटेक ही सगळी कागदपत्र ऑनलाईन भरावी लागतील. म्हाडाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कमीत कमी ‘ह्युमन इंटरफेअर’ लॉटरी प्रक्रियेत कसा ठेवता येईल, या अनुषंगाने सॉफ्टवेअरमध्ये बदल केले जात आहेत.