मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी मध्यरात्री खलबते, अखेर घेतला असा निर्णय?
Maharashtra Cabinet Expansion:दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा यांच्या उपस्थितीत तिन्ही नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत राज्यातील मंत्रिमंडळाची यादी निश्चित होणार असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाण्यात भेट घेतली.
Maharashtra Cabinet Expansion: विधानसभा निवडणुकीत तीन पक्षांच्या महायुतीला घवघवीत यश मिळाले. २३ नोव्हेंबर रोजी निकाल लागला असली तरी शपथविधी सोहळ्यासाठी बारा दिवसांचा कालावधी लागला. त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार अजूनही झालेला नाही. त्यामुळे महायुतीमधील घडामोडींसंदर्भात राज्यातील जनतेलाच नाही तर सर्वच आमदारांना प्रतिक्षा लागली आहे. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या तिन्ही नेत्यांमध्ये मध्यरात्री दीड वाजता खलबते झाले. सुमारे एक तास चाललेल्या या बैठकीत अंतिम निर्णय झाला नाही. यामुळे हा विषय आता दिल्ली दरबारात जाणार आहे. त्यासाठी तिन्ही नेते आज दुपारी दिल्लीला रवाना होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दिल्लीत मोदी, शाह यांच्यासोबत चर्चा
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची मेघदूत बंगल्यावर बैठक झाली. रात्री दिड वाजता एक तास खातेवाटपासंदर्भात या तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. या चर्चेतून अंतिम निर्णय झाला नाही. तिढा सुटत नसल्याने अखेर तिन्ही नेते दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. बुधवारी दुपारी तिन्ही नेते दिल्लीत जाणार आहे. ही भेट सद्धिच्छा भेट असणार आहे, असे सांगितले जात असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार आहे. त्यात विस्ताराचा अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.
शिवसेनेत अडीच वर्षांचा फॉर्म्युला
मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरला आहे. फक्त खाते वाटपासंदर्भात तोडगा निघाला नाही. शिवसेनेला 12 मंत्रीपदे तर भाजपला 20 ते 22 मंत्रिपदे मिळणार आहे. राष्ट्रवादीला 10 मंत्रिपदे दिले जाणार असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत इच्छुकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे अडीच, अडीच वर्ष मंत्री असा फॉर्म्युला आणला आहे. अडीच वर्षानंतर नवीन आमदारांना मंत्रिपदाची संधी दिली जाणार आहे.
भाजपची यादी दिल्लीतून
दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा यांच्या उपस्थितीत तिन्ही नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत राज्यातील मंत्रिमंडळाची यादी निश्चित होणार असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाण्यात भेट घेतली. या भेटीतही मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाली. गृहखाते कोणाकडे जाणार? हे अजूनही महायुतीत ठरत नाही. तसेच भाजप मंत्र्यांची यादी दिल्लीतून येणार आहे. त्यामुळे भाजपच्या मंत्र्यांचे टेन्शन वाढले आहे.