काल अमित शाह यांची भेट त्यानंतर आज माध्यमांसमोर, पंकजा मुंडे यांची पहिल्यांदाच सुरेश धस यांच्या आरोपांवर प्रतिक्रिया
बीड सरपंच हत्या प्रकरणात भाजप आमदार सुरेश धस यांच्याकडून मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले जात आहेत. तसेच सुरेश धस यांनी पंकजा मुंडे यांच्यावरही टीका केली होती. सुरेश धस यांच्या टीकेवर आता पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी काल नुकतंच दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीनंतर पंकजा मुंडे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पर्यावरण मंत्रालयाची सूत्रे हाती घेतल्यानंतर काय-काय कामे सुरु केली, याबाबत माहिती दिली. त्यांनी मुंबईतील प्रदुषण आणि त्यावर करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. यावेळी पंकजा मुंडे यांना बीड सरपंच हत्या प्रकरणी भाजप आमदार सुरेश धस यांच्याकडून करण्यात येत असलेल्या आरोपांबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर पंकजा मुंडे यांनी सविस्तर भूमिका मांडली.
पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या?
“मी माझ्या छोट्या लेव्हलच्या विषयांना हाताळते. माझ्यापेक्षा मोठ्या, अभ्यास असणाऱ्या लोकांना मी उत्तर देऊ शकत नाही. मी एसआयटी लावण्यासाठी पहिलं पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिलं. मी हवं तिथे व्यक्त झाले. नागपूरमध्ये मी माझं मत स्पष्ट सांगितलं. माझ्या विधानसभेच्या फ्लोअरवर उत्तर दिलं. तपास लावतील आणि कोणालाही क्षमा करणार नाही, हे त्यांनी विधानसभेत सांगितलं. माझ्या मनात संवेदना आहेत, मी कधीही इश्यूबेस्ट काम करते”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
“माझ्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी शब्द दिलाय तरी आम्ही त्याच्यावर प्रश्न विचारु तर आमच्या गृहमंत्र्यांवर आमचा विश्वास नसल्यासारखं होईल. घटनेवर बोलून घटनेचा आम्ही बाऊ करतोय असं वाटतं, म्हणून सतत या विषयांवर बोलण्याची आवश्यकता वाटत नाही. मला माहिती नाही यात कोण आहेत तर, मी कुणाचं नाव का घेऊ?, मला माहिती का ते मी होते का तिथे, मग कसा आरोप करु? मी सांगते जे कुणी आरोपी असतील त्यांच्यावर कारवाई, शिक्षा झाली पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक उत्तर दिलं. संतोष देशमुख माझा कार्यकर्ता होता, त्याच्या लेकरांचे चेहरे पाहून मला काय वाटतं हे मी तुम्हाला सांगू शकत नाही”, अशा भावना पंकजा मुंडे यांनी मांडल्या.
“मी न बोलण्याचं काय कारण आहे. ५ वर्ष मी राज्याच्या राजकारणातून बाहेर आहे, कोण अधिकारी, कुठून आलेत मला माहिती आहे? का हे मी आणलेत का? तेव्हाच्या मुख्यमंत्री, पालकमंत्री आणि यंत्रणेने ते अधिकारी आणलेत. यावर मी बोलणं कितपत उचित आहे? संतोष देशमुख यांना न्याय मिळेल तो दिवस माझ्यासाठी उज्ज्वल असेल. त्यांना न्याय मिळणं हे महत्त्वाचं आहे”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
‘पर्यावरणयुक्त परिसर असावा’
“पर्यावरणयुक्त परिसर असावा, यासाठी मी काम करत आहे. मला १०० दिवसांचा प्लान द्यायला सांगितलाय. आम्ही टास्क फोर्स तयार करत आहोत. त्यात परिवहन, हेल्थ विभाग येईल हे पर्यावरणसाठी आहे. मुंबईच्या प्रदुषणाचा आम्ही आढावा घेतला. बऱ्याच ठिकाणी आज यलो अलर्टमध्ये आहोत. ऑरेंज अलर्टमध्ये गेलं तर ते आपल्यासाठी चिंताजनक असतं. आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात कामे सुरु आहेत. भरपूर कामं सुरु असल्यामुळे डस्ट पार्टिकल आहेत. पाण्याचं बाष्पीभवन होत आहे”, असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं.
“बीकेसीमधून आमच्या बोर्डाला फोन आला बीकेसीचं प्रदुषण २०० च्या वर होतं. तिथे आम्ही उपाययोजना केल्या आहेत. मुंबई प्रदुषमुक्त किंवा कमीत कमी प्रदुषण कसं ठेवता येईल याचा आम्ही ड्राफ्ट तयार करत आहोत. मला पूर्ण विश्वास आहे, आम्ही प्लान तयार केला, तो फेब्रुवारीपर्यंत कमी करण्याचा प्रयत्न करत आहोत. पोल्यूशन कंट्रोल बोर्ट सर्व नोटीशी जारी करत असतात, बांधकामं काही ठिकाणी थांबवले आहेत. जे प्लास्टिक हानिकारक आहे ते बंद करण्यासाठी कडक उपाययोजना करु”, असंही पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितलं.