जरांगेंच्या आंदोलनाने महाराष्ट्रात महाभूकंप, कोणी-कोणी दिले राजीनामे?
मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रात राजीनाम्यांचं सत्र सुरु झालंय. विधानसभेपासून लोकसभेपर्यंत राजीनाम्यांच्या सत्राला सुरुवात झालीय. आमदार, खासदार पासून ते ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य, विविध पक्षांचे जिल्हाध्यक्ष, तसेच इतर पदाधिकाऱ्यांकडून राजीनाम्यांचे सत्र सुरु झालंय.
मुंबई | 30 ऑक्टोबर 2023 : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. विशेष म्हणजे आरक्षणासाठी आता राजीनाम्यांचं सत्र सुरु झालं आहे. मराठा आरक्षणासाठी गेल्या आठवड्यात हजारो गावांमध्ये नेतेमंडळींना गावबंदी घालण्यात आली. त्यानंतर आता बरेच नेतेमंडळी मराठा आरक्षणासाठी आपापल्या पदाचे राजीनामे देत थेट मराठा आरक्षणाला पाठिंबा देत आहेत. भाजप खासदार हेमंत पाटील, नाशिकचे शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे, बीडच्या गेवराईचे भाजप आमदार लक्ष्मण पवार यांनी देखील आमदारकीचा राजीनामा दिलाय. यानंतर आणखी एक मोठी बातमी समोर आलीय.
खासदारांचे राजीनामे
- मराठा आरक्षणासाठी नाशिकचे शिंदे गटाचे आमदार हेमंत गोडसेंनी राजीनामा दिलाय.
- काल शिंदे गटाचेच हिंगोलीचे खासदार हेमंत पाटलांनीही राजीनामा दिला.
आमदारांचे राजीनामे
- बीडच्या गेवराईतले भाजपचे आमदार लक्ष्मण पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिलाय
- काँग्रेसचे आमदार सुरेश वरपूडकर यांनीदेखील आमदारकीचा राजीनामा दिलाय. सुरेश वरपूडकर यांनी विधानसभा अध्यक्षांकडे पत्राद्वारे राजीनामा पाठवला आहे. सुरेश वरपूडकर हे परभणीच्या पाथरी विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार आहेत. मराठा धनगर तसेच मुस्लिम आरक्षणाच्या मागणीसाठी राजीनामा देत असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केलंय. आमदार सुरेश वरपुडकर यांच्या मतदारसंघात तीन दिवसांपूर्वी ताफा आडवत काही युवकांनी राजीनामा देण्याची मागणी केली होती. त्यानंतर त्यांनी आज राजीनामा दिलाय.
पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
- नांदेडच्या ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख नागेश पाटलांचा राजीनामा
- नांदेडमध्ये शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख बाबूराव कदम कोहळीकरांचा राजीनामा
- बीडमध्ये अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाणांचा राजीनामा
- यवतमाळमध्ये माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकरांचा काँग्रेसमधून राजीनामा
- शिंदे गटाचे चिंचवड विधानसभा प्रमुख सुरेश राक्षेंचा राजीनामा
- बीडमधले शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख परमेश्वर तळेकरांचा राजीनामा
- मनमाडमध्ये माजी आमदार आणि मनमाड बाजार समितीचे सभापती संजय पवारांचा राजीनामा
- नांदेडमध्ये शिंदे गटाचे हदगाव इथले तालुकाप्रमुख विवेक देशमुखांचा राजीनामा
- कराडमधल्या प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष सतिश पाटील यांचा राजीनामा
- पंढरपूरच्या कौठाळी ग्रामपंचायतचे सदस्य बापू शिवाजी गोडसेंचा राजीनामा
- सोलापूरच्या माढ्यात वडाचीवाडी गावचे सरपंच रमेश भुईटेंनी राजीनामा दिला
- जळगावात भडगाव तालुक्यातल्या कजगाव ग्रामपंचायतीत 3 सदस्यांचे राजीनामे
- नगरच्या अहमदनगर इथल्या बुरुडगावच्या ग्रामपंचायत सदस्यांचा सामूहिक राजीनामा
- कोल्हापूरच्या पाडळी खुर्द गावात ग्रामपंचायत सदस्या नीलम कांबळेंचा राजीनामा
- परभणीच्या जिंतूरमध्ये वाघी बोबडे इथल्या सरपंच, उपसरपंचांसह सदस्याचे राजीनामे
- पुण्याच्या दौंडमधल्या कानगाव ग्रामपंचायतीच्या ३ सदस्यांचा राजीनामा