‘त्या’ वादग्रस्त व्हिडीओनंतर तीन दिवसाने प्रकाश सुर्वे यांनी मौन सोडलं, म्हणाले, मला घशाचा संसर्ग…
वादग्रस्त व्हिडीओ प्रकरणानंतर अखेर आमदार प्रकाश सुर्वे यांनी मौन सोडलं आहे. सुर्वे यांनी मीडियाला निवेदन पाठवून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच तीन दिवसानंतर बोलण्याचं कारणही सांगितलं.
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या रॅलीतील आमदार प्रकाश सुर्वे आणि शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ मॉर्फ करून टाकला गेल्याचं सांगितलं जात आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शीतल म्हात्रे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पोलीस अधिकारी आणि स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. प्रकाश सुर्वे यांच्या मुलानेही पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. तसेच महिला आयोगानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी काही लोकांना अटकही केली आहे. शीतल म्हात्रे यांनी दोन तीन वेळा या प्रकरणावर त्यांची प्रतिक्रियाही व्यक्त केली होती. मात्र, आमदार प्रकाश सुर्वे यांनी कोणतीच प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत होतं. अखेर सुर्वे यांची प्रतिक्रिया आली आहे.
आमदार प्रकाश सुर्वे यांनी माध्यमांना देण्यासाठी हे पत्र लिहिलं आहे. या पत्रातून त्यांनी हा व्हिडीओ चुकीचा असल्याचं म्हटलं आहे. हा व्हिडीओ मॉर्फ करून कुणी तरी त्यात गाणं अपलोड करून विकृतपणा केल्याचं सुर्वे यांनी म्हटलं आहे. तसेच शीतल म्हात्रे आपल्याला बहिणीसारख्या आहेत, असं सांगतानाच विरोधकांना नैराश्य आलं आहे. माझ्या मतदारसंघात सुरू असलेली विकासकामे त्यांना पाहवत नाहीत. त्यामुळेच हा विकृतपणा करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.
प्रकाश सुर्वे यांचं पत्र जसंच्या तसं
संपादक, सर्व माध्यम प्रतिनिधी,
विषय: श्रीकृष्ण नगर पुलाच्या उद्घाटन कार्यक्रमा दरम्यान काढलेल्या रेली
बाबत विरोधकांनी पसरविलेल्या खोटया व्हिडीओ आणि अपप्रचाराबाबत
निवेदन.
महोदय,
मी गेल्या महिन्याच्या 18 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारीपर्यंत माझ्या प्रकृतीच्या कारणास्तव व्होकार्ड इस्पितळामध्ये दाखल होतो. सध्या मला थ्रोट इंफेक्शनचा त्रास असल्याने व सततचा खोकला असल्याने बोलण्यास त्रास होत आहे. मात्र गेल्या शनिवारी झालेल्या कार्यक्रमानंतर मी काही बोलत नाही असे चूकीचे अर्थ काढून अपप्रचार केल्या जात असल्याने मी हे विस्तृत निवेदन देत आहे.
दिनांक 11.03.२०२३ रोजी मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी मुख्यमंत्री झाल्यापासून केवळ 10 महिन्याच्या आत माझ्या मागाठाणे विधानसभा मतदार संघामधील विविध प्रश्न आणि समस्या समजून घेत त्यावर प्रशासकिय अधिका-यां सोबत बैठका घेत सर्व प्रश्नांवर तोडगा काढत विविध विकास कामांना मंजुरी देत ती स्वतः जातीने लक्ष देत पूर्ण करुन घेतलेली आहेत. यामध्ये श्रीकृष्ण नगर येथील जुना पूल तोडून तेथे नवीन पूल बांधणी वेगाने करून घेतली.
माझ्या मतदार संघातील श्रीकृष्ण नगर, अभिनव नगर, काजुपाडा, चौगुले नगर, अशोकनगर, नॅन्सी कॉलनी, महिंद्रा कॉलनी व इतर विभागातील हजारो नागरिकांना या पूलाचा फायदा होणार आहे. या सोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 30 कोटी रुपये मंजूर करून एम.एम.आर.डी.ए अंर्तगत मुंबईमधील प्रथम एक्सीलेटर (सरकता जीना असलेला स्कायवॉक मंजुर केला) हा स्कायवॉक समतानगर ते पोईसर मेट्रो स्टेशनपर्यंत आहे. याचा फायदा समतानगर, सिध्दार्थनगर, ठाकूर कॉम्पलेक्स, वैभव नगर, जानुपाडा व इतर विभागातील हजारो नागरिकांना दररोजच्या प्रवासासाठी होणार आहे.
या दोन मोठया प्रकल्पापैकी एकाच लोकार्पण आणि एकाच भूमीपूजन मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी दिनांक 11.03.2023 रोजी केलं. यावेळी हजारो नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानण्याकरिता मोठ्या संख्येने गर्दी करून हजेरी लावली आणि त्यांच्या कामाप्रती आभार व्यक्त केले.
माझ्या संपूर्ण राजकीय जीवनात मी कायम सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविणे आणि त्यांच्यासाठी सोयीसुविधा उपलब्ध करून देणे या करिता जीवापाड मेहनत केली. लोकप्रतीनिधी म्हणून प्रशासना सोबत कामांचा पाठपुरवठा करून ती पूर्ण करून लोकसेवेत देणे हे माझे कर्तव्य मानले आहे आणि या कामाच्या जोरावरच आणि जनतेच्या प्रेमामुळेच जनतेने मला दोन वेळा निवडून दिले आहे.
सध्याएकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यापासून माझ्या मतदारसंघात जोमाने सुरु असलेल्या विविध विकास कामांच्या धडाक्यामुळे स्वतःच्या राजकीय जीवनात हताश झालेले माझे विरोधक लोकोपयोगी कामे करण्याऐवजी लोकप्रकल्पांच्या कामांपासून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्याकरिता व्हिडीयो मोर्फकरणे खोटे चारित्रहनन करणे अशा विकृत गोष्टी करत आहेत. यामधून त्यांचे राजकीय नैराश्य दिसून येते सर्वसामान्य लोकांना मात्र त्यांच्यासाठी 24 तास लोकांमध्ये राहून काम करणारे लोकप्रतिनीधी आवडतात आणि लोक त्यांच्यामागे उभे राहतात हा माझा अनुभव आहे.
दिनांक ११.०३.२०२३ रोजी लोकप्रकल्पांच्या उद्घाटन सोहळ्यानंतर हजारो लोकांच्या गर्दीच्या उपस्थितीत मा. एकनाथ शिंदे साहेब यांची रेली झाली यावेळी प्रचंड गर्दीत आणि प्रचंड आवाजात मला बहिणी समान असणा-या माजी नगरसेविका सौ. शीतल म्हात्रे मला या कार्यक्रमाबाबत काही सांगत असतानाच्या व्हिडीयोमध्ये चुकिचे गाणे घालून महिलांचा अपमान करण्याच्या विकृत मानसिकतेमधून हा व्हिडीयो सोशल मिडीयाच्या माध्यमातून प्रसारित केला गेला अशाप्रकारचे कृत्य हे हा व्हिडीयो बनविणाऱ्यांची महिलांच्या प्रति असलेली ही मानसिकता दाखवून देते.
छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांचा आदर आणि सन्मान करण्याची शिकवण उभ्या महाराष्ट्राला दिली आहे. हीच शिकवण स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सर्व शिवसैनिकांना दिली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही हीच शिकवण अंगीकारली आहे. या बनावट व्हिडीओ प्रकरणात मुंबई पोलीसांनी तडफेने कारवाई करत या षडयंत्राबाबत संशयितांना अटक केली आहे.
त्यामुळे तपासातून याबाबतचे सत्य सामोरे येईल अशाप्रकारचे व्हिडीओ पसरवून लोकांचे लक्ष विचलीत करता येईल. मात्र लोकांचे मन जिंकण्याकरिता लोकांमध्ये राहून लोकांची कामे करत रहावी लागतात. विरोधक आमच्या कामांमधून लोकांची कामे करण्याची प्रेरणा घेतील अशी भी अपेक्षा करतो. या सर्व प्रकारामुळे माझे कुटुंबीय आणि मला प्रचंड मानसिक त्रास झाला आहे. ज्या कुणी हा व्हिडीओ बनविला असेल त्यांना परमेश्वर सदबुद्धी देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
जय महाराष्ट्र
आपला,
प्रकाश सुर्वे, आमदार मागाठाणे विधानसभा