शिवसेनेचं प्रमुखपद स्वीकारणार का?; राज ठाकरे यांचं सर्वात मोठं विधान काय?
"तेव्हा ३२ आमदार सहा-सात खासदार म्हणाले. आपण एकत्र बाहेर पडू. माझा दौरा सुरू केला. त्यांना वाटलं मी काँग्रेसमध्ये जाईन. मी त्यांना पहिल्यांदाच सांगितलं की, मला पक्ष फोडून कोणतीही गोष्ट करायची नाही. आता माझ्या मनात विचार नाही. उद्या पाऊल उचललं तर स्वत:चा पक्ष काढेन. पण मी कुणाच्या हाताखाली काम करणार नाही", असं राज ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात आपली सविस्तर भूमिका मांडली. राज ठाकरे काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी दिल्लीला गेले होते. राज ठाकरे यांनी अमित शाह यांच्यासोबत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बातचित केली होती. राज ठाकरे दिल्ली दौऱ्याहून परतल्यानंतर विविध चर्चांना उधाण आलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचं नेतृत्व राज ठाकरे करणार, अशी चर्चा सुरु झालेली. या चर्चेवर आज अखेर राज ठाकरे यांनी मौन सोडलं. त्यांनी या चर्चांवरुन पत्रकारांवर निशाणा साधला. विशेष म्हणजे त्यांनी या चर्चांवर सविस्तर खुलासा केला.
“अमित शाह यांना भेटायला गेलो. त्यावेळी ते आणि मी होतो. तुम्हाला कुठून कळलं. मी दिल्लीत पोहोचलो काय. राज ठाकरेंना १२ तास थांबायची वेळ आली. अरे गधड्या दुसऱ्या दिवशीची बैठक होती. आदल्या दिवशी पोहोचलो. त्यात थांबायचं काय आलं. हे थांबत नाही. मला असं वाटते. तिकडे काही पत्रकार भेटले. म्हटले कधी भेटायचं. म्हटलं मला नाही भेटायचं. माझ्याकडे सांगण्यासारखं काही नसेल तर का भेटू. भेट झाली. विमानतळावर आलो. इकडून जाताना पण वोह देखो जा रहे है… हल्ली हे असतात. पूर्वी आचारसंहितेवाले असायचे”, असं राज ठाकरे म्हणाले.
‘अरे मूर्खाने मला व्हायचे असते तर…’
“एकदा मी बाथरूमला चाललो होतो. विनोदाने सांगत नाही. खरंच तो माझ्या मागे आला. म्हटलं पुढे काय करायचं ठरवलंय. मी म्हटलं आपलं आपणच करायचं की आपण काही सहकार्य करणार आहात. कुठे जरा मोकळीक नाही. घराच्याबाहेर पत्रकार बसलेले असतात. एखादी गोष्ट ठरली तर मी सांगेन ना. मी लपून लपून निवडणुका लढवेल. मतदारांना सांगू नको. कुणाला सांगू नको असं काही आहे का. काही ठरलं तर पत्रकार परिषद घेऊन सांगेल ना… आता काही मिळत नाही मग एपिसोड कसा पुढे न्यायचा. राज ठाकरे शिंदेच्या शिवसेनेचे प्रमुख होणार. अरे मूर्खाने मला व्हायचे असते तर तेव्हाच झालो नसतो का?”, असा सवाल राज ठाकरेंनी केला.
राज ठाकरेंचा मोठा खुलासा
“तेव्हा ३२ आमदार सहा-सात खासदार म्हणाले. आपण एकत्र बाहेर पडू. माझा दौरा सुरू केला. त्यांना वाटलं मी काँग्रेसमध्ये जाईन. मी त्यांना पहिल्यांदाच सांगितलं की, मला पक्ष फोडून कोणतीही गोष्ट करायची नाही. आता माझ्या मनात विचार नाही. उद्या पाऊल उचललं तर स्वत:चा पक्ष काढेन. पण मी कुणाच्या हाताखाली काम करणार नाही. ही गोष्ट मी मनात खुणगाठ बांधली होती. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाय कुणाच्या हाताखाली काम करणार नाही. तरीही एकाला संधी दिली होती. समजलंच नाही. जाऊन दे. तो झाला भूतकाळ. त्यामुळे असल्या कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका. मी कोणत्याही शिवसेनेचा प्रमुख अध्यक्ष होणार नाही. मी जे मनसे नावाचं अपत्य जन्माला घातलंय त्याचाच मी अध्यक्ष राहणार. तुमच्या विश्वासावर पक्ष उभा केला. १८ वर्ष झाली. असली गोष्ट मनाला शिवतही नाही. मी हसत होतो. त्यांचे काही करू शकत नाही. आज मला असे वाटते. वेगवेगळ्या बातम्या येत होत्या”, असा खुलासा राज ठाकरेंनी केला.