Bala Nandgaonkar : महाभारतातही संजय होता ना, मग ते सोबत असले तर आम्हाला सुरक्षेची चिंता नाही; नांदगावकरांचा संजय राऊतांना टोला
राज ठाकरे यांनी पुणे दौरा आटोपता घेतला. तसेच अयोध्या दौरा रद्द केला, या पार्श्वभूमीवर बाळा नांदगावकर माध्यमांशी बोलत होते. अयोध्या दौऱ्याला सुरक्षा हवी असल्यास आम्ही पुरवतो, असे विधान शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले होते. त्यालाही बाळा नांदगावकर यांनी प्रत्युत्तर दिले.
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा अयोध्या दौरा रद्द झाला. यावर उलटसुलट चर्चा करण्याची आवश्यकता नाही. ते 22 तारखेला बोलणारच आहेत. त्यावेळी ते दौरा रद्द का केला, याबद्दल सांगतील, अशी माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala nandgaonkar) यांनी दिली आहे. ते मुंबईत बोलत होते. राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावेळी सुरक्षा पुरवू, असे म्हणणाऱ्या शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावरही त्यांनी यावेळी टीका केली. राज ठाकरे यांची पुण्यात सभा आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्येही म्हटले आहे, की 22 तारखेला बोलूच. त्यामुळे तुमच्यासह मलाही उत्सुकता आहे, की ते काय बोलतील. तर त्यांच्या प्रकृतीच्या कारणास्तव अयोध्या (Ayodhya) दौरा रद्द केल्याचे बोलले जात आहे. त्यावर मात्र नांदगावकर यांनी बोलणे टाळले. प्रकृतीच्या कारणास्तव दौरा रद्द केला असेल तर त्यावर बोलणे उचित ठरणार नाही. याविषयी स्वत: राज ठाकरेच बोलू शकतील, असे यावेळी बाळा नांदगावकर म्हणाले आहेत.
‘आता एवढेच बाकी राहिले होते’
राज ठाकरे यांनी पुणे दौरा आटोपता घेतला. तसेच अयोध्या दौरा रद्द केला, या पार्श्वभूमीवर बाळा नांदगावकर माध्यमांशी बोलत होते. अयोध्या दौऱ्याला सुरक्षा हवी असल्यास आम्ही पुरवतो, असे विधान शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले होते. त्यालाही बाळा नांदगावकर यांनी प्रत्युत्तर दिले. आता एवढेच बाकी राहिले होते, असे म्हणत त्यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली. महाभारतातही संजय होता ना. मग ते सोबत असले तरी आम्हाला काही चिंता नाही. सुरक्षा आपोआपच मिळेल आम्हाला. त्यामुळे त्यांनी आमच्या सोबत यावे, असा टोला त्यांनी लगावला.
‘विरोधकांचे काम विरोध करण्याचे’
औरंगाबादच्या सभेत राज ठाकरे यांनी कोणाचाही उल्लेख केला नव्हता. न उल्लेख करतानाही त्यांचा उल्लेख केला जात असेल तर त्याचा आम्हाला आनंद होत आहे, असे ते म्हणाले. विरोधकांचे काम विरोध करण्याचेच असते. अयोध्या दौऱ्याला निघालो तर टीका केली. आता दौरा रद्द केला तरीही ते बोलत आहेत, असे नांदगावकर म्हणाले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला अयोध्या दौरा स्थगित केला आहे. तूर्तास हा दौरा स्थगित केला असल्याची घोषणा राज ठाकरेंनी सोशल मीडियावर पोस्ट करत दिली. 5 जून रोजी राज ठाकरेंचा अयोध्या दौरा होणार होता. हा दौरा तूर्तास स्थगित करण्यात आला आहे. 22 मे रोजी पुण्यात होणाऱ्या सभेत राज ठाकरे आपल्या अयोध्या दौऱ्याबाबत सविस्तर भूमिका मांडणार आहेत. 5 जून रोजी होणारा राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा तूर्तास स्थगित होण्याची शक्यता टीव्ही 9 मराठीच्या विश्वसनीय सूत्रांनी वर्तवली होती.