‘आम्हाला करायचंय ते करु, पोलीस पोलिसांचं काम करतील’, मनेसेने राहुल गांधी यांच्या विरोधात शड्डू ठोकला
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी राहुल गांधींच्या वक्तव्यावर आक्रमक पवित्रा घेतलाय.
मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त विधान केलंय. त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद निर्माण झालाय. भाजप, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नेते यांच्या पाठोपाठ मनसेकडूनही राहुल गांधींच्या वादग्रस्त विधानावर निषेध व्यक्त केला जातोय. विशेष म्हणजे महाविकास आघाडीत काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेना पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनीदेखील आपण राहुल गांधींच्या मताशी सहमत नसल्याची भूमिका मांडली आहे. दुसरीकडे राहुल गांधींच्या विधानामुळे महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच तापताना दिसत आहे. मनसे तर उद्या शेगावात राहुल गांधींची सभा असणाऱ्या शेगावात निषेध व्यक्त करणार आहे.
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी राहुल गांधींच्या वक्तव्यावर आक्रमक पवित्रा घेतलाय. विशेष म्हणजे ते मुंबईतील आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन शेगावच्या दिशेला निघाले आहेत. त्यांनी राज्यभरातील कार्यकर्त्यांना उद्या शेगावात दाखल होण्याचं आवाहन केलंय.
शेगावात उद्या राहुल गांधींची सभा होणार आहे. त्यामुळे मनसेही उद्या शेगावात राहुल गांधींच्या वादग्रस्त विधानावरुन निषेध व्यक्त करणार आहे.
“राहुल गांधी जो थिल्लरपणा करत आहेत ते आम्ही खपवून घेणार नाहीत”, असा इशारा संदीप देशपांडे यांनी दिलाय.
“आम्ही लोकशाहीला मानणारे लोकं आहोत. जे करु ते लोकशाही मार्गानेच करु. पोलीस पोलिसांचं काम करतील. कायदा कायद्याचं काम करेल. आम्हाला जे करायचंय ते आम्ही करु”, असं संदीप देशपांडे म्हणाले.
“महापुरुषांचे अपमान आम्ही सहन करणार नाहीत. आणि जे अपमान करतील त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही”, असादेखील इशारा त्यांनी दिला.