मनसेला भाजपची रसद; मंदिरावर लावण्यासाठी कंबोजांकडून 10 हजार भोंग्यांची ऑर्डर; म्हणे, राऊत जेलमध्ये जाणार!
मोहित कंबोज यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, संजय राऊत हे आमचे जावेद आहेत. ते खोटे दावे करतात. त्यांचे यांचे नवे स्क्रिप्ट राइटर म्हणतायत मुंबई केंद्रशासित होतेय. जर तसे होत असेल, तर पोलीसांत जा, चौकशी करा.
मुंबईः ऐन मुंबई महापालिका (Municipal Corporation) निवडणुकीच्या तोंडावर कडव्या हिंदुत्वाच्या घोड्यावर स्वार झालेले राज ठाकरे यांनी बळ देण्यासाठी भाजपमधून मोहित कंबोज (Mohit Kamboj) पुढे आलेत. त्यांनी मंदिरावर लावण्यासाठी 10 हजार भोंगे आणि एप्लिफायरची ऑर्डर दिल्याचे सांगितले आहे. सध्या मुस्लिम बांधवांचा रमजान महिना सुरू आहे. त्यात सुरू झालेले मशिदीवरील भोंगे विरुद्ध मंदिरावरील भोंग्याचे राजकारण राज्याला कोणत्या दिशेने नेणार याची चिंता अनेकांना सतावतेय. इतक्या दिवस भाजपचे नरेंद्र मोदी यांच्यावर टीकेचे आसूड ओढणारे राज ठाकरे यांनी पाडव्याच्या सभेत त्यांचे पुन्हा एकदा तोंडभरून कौतुक केले. अन् मशिदीवरील भोंगे बंद करा, अशी नवीच मागणी केली. त्यावरून अनेक ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) कार्यकर्ते आक्रमक झालेत. राज यांची मंगळवारी 12 एप्रिल रोजी ठाण्यात सभा आहे. त्या सभेत ते अजून काय बोलणार, याची उत्सुकता लागलीय.
मनसेला भाजपचे बळ
राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याचा विषय काढताच त्यांच्या मदतीला आला भाजप समोर आल्याचे दिसत आहे. त्यामुळेच तर मोहित कंबोज यांनी दहा हजार भोंगे आणि एप्लिफायरची ऑर्डर दिल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, मंदिराबाहेर लावण्यासाठी हे भोंगे सगळ्यांना मोफत दिले जातील. सध्या रमजान सुरू आहे. त्यामुळे आवाजाची मर्यादा ठेवून हे एप्लिफायर बनवा अशी ऑर्डर दिलीय.
राऊत पुन्हा लक्ष
मोहित कंबोज यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, संजय राऊत हे आमचे जावेद आहेत. ते खोटे दावे करतात. त्यांचे नवे स्क्रिप्ट राइटर म्हणतायत मुंबई केंद्रशासित होतेय. जर तसे होत असेल, तर पोलिसात जा, चौकशी करा. त्यांच्याभोवती ईडीचा फास आवळतोय. त्यांनी पत्राचाळीत साडेपाचशे लोकांना रस्त्यावर आणले. लोकांचा एफएसआय विकून स्वतःचे घर बनवले, असा दावाही केला.
राऊत जेलमध्ये जाणार
कंबोज पुढे म्हणाले की, संजय राऊत हे 12 कोटी जनतेचे मराठी माणूस आहेत का? भ्रष्टाचाराच्या पैशांनी त्यांनी घर बनवले. आज राम नवमी आहे. मी स्वतः सांगतो, सलीम भाई गेलेयत. हे जावेद भाई पण लवकरच जेलमध्ये जाणार. राऊत यांनी कंबोज यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी केलीय. यावर कंबोज म्हणाले की, मी कोणते कपडे घालतो, काय करतो, कोणती चड्डी घालतो, माझी चौकशी करा म्हणतात ना. मी सगळ्यांचा हिशेब देणार, पण ते जेलमध्ये जाणार.