तर देवेंद्र फडणवीस यांचा आम्ही सत्कार करू, संजय राऊत यांचं मोठं विधान; कारण काय?
ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी बारसूतील आंदोलन आणि कर्नाटकातील निवडणूक प्रचारावरून भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवला आहे. उद्धव ठाकरे बारसूत जाणार असल्याचं सांगतानाच अडवून दाखवाच, असं आव्हानही त्यांनी दिलं आहे.
निखिल चव्हाण, टीव्ही9 मराठी, मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल मॉरिशसला होते. तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा फडकल्याबद्दल त्यांना आनंद झाला. पण बेळगावात छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा वारंवार उतरवला जातो. महानगर पालिकेवरून, कार्यालयांवरून. त्याबाबत जर फडणवीस यांनी काही भूमिका घेतली आणि बेळगावात जाऊन एकीकरण समितीच्या प्रचारात सामिल झाले तर आम्ही त्यांचा सत्कार करू. आहे हिंमत? आम्ही चाललो आहोत, असं आव्हानच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलं आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडमवीस यांना माझं आवाहन आहे. त्यांनी बेळगावात जाऊन महाराष्ट्र एकीकरण समितीचा प्रचार केला पाहिजे. पण दिसतं ते उलटच दिसतंय. भाजपच्या फौजा एकीकरण समितीच्या उमदेवारांचा पराभव करायला गेल्या आहेत. लाज वाटली पाहिजे. तुम्हाला. तिकडे बेळगावचे लोकं लाठ्याकाठ्या खाऊन तुरुंगावास भोगत आहेत. इकडे तुम्ही राज्यापालांच्या अभिभाषणात बेळगाव आमचं आणि ते आम्ही आणू असं सांगत आहे. भाजपचे प्रमुख लोक बेळगावसह सीमाभागात मराठी माणसांचा पराभव करण्यासाठी जात आहेत. हे दुर्देव आहे, या महाराष्ट्राचं, असं संजय राऊत म्हणाले.
मुख्यमंत्र्यांना आव्हान
आम्ही बेळगावात जाऊन आंदोलन केलं असं राज्याचे मुख्यमंत्री वारंवार सांगत आहेत ना. तुम्ही खरोखरच आंदोलन केलं असेल तर आता जाऊन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांचा प्रचार करा आणि भाजपच्या उमदेवारांच्या पराभवाचं आवाहन करा, असं आव्हानच राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलं.
आम्ही येतोय, अडवून दाखवा
बारसूत अजूनही अत्याचार सुरू आहे. अजूनही पोलीस कारवाया सुरू आहेत. महिला आणि शेतकऱ्यांवर जोर जबरदस्ती केली जात आहे. उद्धव ठाकरे यांना कोकणात पाय ठेवू देणार नाही ही धमकी आहे. अशा धमक्यांना शिवसेना भीक घालत नाही. यावेळी ही जाणार. हिंमत असेल तर अडवून दाखवा. लांबून कुठून तरी तोंड काळं झाल्यासारखं काळा झेंडा दाखवतात. आम्ही येतोय. अडवून दाखवा, असं आव्हानच त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना नाव न घेता दिलं आहे.
महाड कोकणातच आहे
कोकण कुणाच्या मालकीचं नाही. कोकण हे ऊर्जा स्त्रोत आहे. उद्धव ठाकरे बारसूत जातील. लोकांची इच्छा आहे. उद्धवजी जातील. कोणी चिंता बाळगू नये. 6 मेला उद्धव ठाकरे जात आहे. त्यांची महाडला मोठी सभा आहे. तेही कोकणातच आहे. कोकणात कुणाचे पाय घट्ट आहेत आणि कुणाचे लटपटत आहेत. हे आधीही जनतेने दाखवलं आहे. यापुढेही दाखवेल, असंही ते म्हणाले.