टीकेचे आसूड ओढणाऱ्या अजितदादांना अमोल कोल्हेंचे परखड सवाल; म्हणाले, मला तुमच्या पक्षात का बोलवताय?
Amol Kolhe on Ajit Pawar and Loksabha Election 2024 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या टीकेला खासदार अमोल कोल्हे यांचं प्रत्युत्तर. अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांनी काही थेट सवाल विचारलेत. फेसबुकवर एक व्हीडिओ शेअर करत अमोल कोल्हे यांनी अजित पवारांना सवाल केलेत. वाचा...
मुंबई | 05 मार्च 2024 : लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला आहे. अशात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. विरोधी पक्षातील नेत्यांवर आरोप केले जात आहेत. पुण्यातील सध्याची स्थिती पाहता शिरूर लोकसभा मतदारसंघातील लढत अत्यंत अटीतटीची झाली आहे. डॉ. अमोल कोल्हे हे महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार असण्याची दाट शक्यता आहे. पण अमोल कोल्हे यांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच चॅलेंज दिलंय. अमोल कोल्हे यांच्या विरोधातील उमेदवाराला निवडून आणण्यासाठी जीवाचं रान करण्याचं अजित पवारांनी ठरवलं आहे. अजित पवार वारंवार अमोल कोल्हे यांच्यावर टीका करतात. त्यांच्या टीकेला अमोल कोल्हे यांनी प्रत्युत्तर दिलंय.
अजित पवारांचं टीकस्त्र
काल शिरूरमधील मांडवगण फराटा या ठिकाणी अजित पवार गटाकडून शेतकरी मेळावा आयोजित केला होता. इथं बोलताना अजित पवारांनी अमोल कोल्हेंवर टीकास्त्र डागलं. लोकसभेच्या निवडणुकीवेळी खासदार अमोल कोल्हे म्हणतील की, आता यापुढं मी काम करेन. बघा आता ही त्यांचे नाटकाचे प्रयोग सुरु आहेत.त्यातून ते वातावरण निर्मिती करतायेत, ही तात्पुरती आहे. महाराजांचा इतिहास आपल्याला जपायचा आहेय पण कोल्हे यांनी पाच वर्षे काय केलं, याचा ही विचार करा, असं म्हणत अजित पवारांनी टीका केली. त्यांच्या या टीकेला अमोल कोल्हे यांनी उत्तर दिलं आहे.
अमोल कोल्हे यांचं प्रत्युत्तर
अजित पवार बडे नेते आहेत. त्यांना माझ्यासारख्या कार्यकर्त्यानं उत्तर देणं योग्य नाही. पण माझ्यावर वैयक्तिक आरोप झाल्याने मी बोलतोय. अजितदादा म्हणतात उमेदवार नसतो, तेव्हा कलाकाराला तिकिट दिलं जातं. यासाठी त्यांनी काही सेलिब्रिटींची उदाहरणं दिली. पण मी नम्रतापूर्वक सांगतो की, तुम्ही उदाहरण दिलेल्या एकाही सेलिब्रिटी खासदाराला संसदरत्न पुरस्कार मिळाल्याचं माझ्या ऐकिवात नाही. जनतेच्या आशिर्वादाने त्यांचे प्रश्न मांडत असताना पहिल्याच टर्ममध्ये तब्बल तीन वेळा मला संसदरत्न पुरस्कार प्राप्त झाला आहे, असं अमोल कोल्हे म्हणाले.
अजित पवारांना थेट सवाल
खासगीतील गोष्टी बाहेर सांगायच्या नाहीत हा अलिखित संकेत मी कायम पाळला. पण आता तुम्ही वारंवार या गोष्टींचा उल्लेख करत असाल तर मी नम्रपणे. अशा कार्यकर्त्याला उमेदवारी देणं ही चूक असेल तर मग माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना माझ्या पक्षात या, असा निरोप पाठवण्याचं कारण काय? लपून छपून भेटी करण्याचं कारण काय?, असा सवाल अमोल कोल्हे यांनी विचारला आहे.