Pravin Darekar : सोमय्यानंतर प्रवीण दरेकरांनाही पोलिसांची नोटीस, मुंबै बँक प्रकरणात पुन्हा चौकशी होणार
मुंबै बँक मजूर प्रकरणात मुंबई पोलिसांनी प्रवीण दरेकरांना पुन्हा चौकशीसाठी पोलिसांनी नोटीस बजावली आहे. त्यांना 11 एप्रिलला चौकशीला बोलावणही आलं आहे. काही दिवसांपूर्वीही प्रवीण दरेकरांना पोलिसांनी नोटीस बजावली होती.
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून भाजप नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लागला आहे. मुंबै बँक मजूर (Mumbai Bank Case) प्रकरणात मुंबई पोलिसांनी प्रवीण दरेकरांना पुन्हा चौकशीसाठी पोलिसांनी नोटीस बजावली (Mumbai Police Notice) आहे. त्यांना 11 एप्रिलला चौकशीला बोलावणही आलं आहे. काही दिवसांपूर्वीही प्रवीण दरेकरांना पोलिसांनी नोटीस बजावली होती. दरेकरांना पोलीस नोटीस बजावण्याची आता ही दुसरी वेळ आहे. गेल्या वेळी मी चौकशीला जाणार, कर नाही त्याला डर कशाला? मी पोलिसांना पूर्ण सहकार्य करणार, या प्रकरणात कोणताही घोटाळा झाला नाही, असे दरेकरांनी ठामपणे सांगितले होते. तर दुसरीकडे भाजप नेते किरीट सोमय्या यांनाही कालच पोलिसांनी चौकशीसाठी समन्स बजावला होता. आयएनएस विक्रांत प्रकरणात किरीट सोमय्या यांच्याविरोधात तक्रार दाखल झाली आहे. त्यामुळे भाजपचे दोन नेते आता पोलीस चौकशीच्या फेऱ्यात आहेत.
दोन नेत्यांमागे चौकशीचा ससेमिरा
गेल्या अनेक दिवसांपासून या चौकशांवरून राजकारण तापलं आहे. अधिवेशनाआधी जेव्हा प्रवीण दरेकरांवर हे आरोप झाले त्यावेळी याचवरून प्रवीण दरेकर आक्रमक झाले होते. मला मुद्दाम अडकवण्याचा प्रयत्न होत आहे. पोलिसांचा राज्यात चुकीच्या मार्गाने वापर सुरू आहे. पोलिसांना भाजपच्या नेत्यांविरोधात वापरलं जातंय. असा थेट आरोप प्रवीण दरेकरांनी केला होता. तर भाजप नेते किरीट सोमय्या हेही याचवरून रोज महाविकास आघाडी सरकारला टार्गेट करत असतात. भाजप नेते किरीट सोमय्या आणि संजय राऊत यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सतत शाब्दिक वार पलटवार सुरू आहेत. कधी सोमय्या राऊतांवर आरोप करतात, तर राऊत सोमय्यांवर, आता संजय राऊतांनी किरीट समोय्या यांनी आयएनएस विक्रांत प्रकरणात घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे त्यांच्याही मागे चौकशीचा ससेमिरा लागला आहे.
दरेकरांची पुन्हा राऊतांवर टीका
शुक्रवारी शरद पवारांच्या घराबाहेर झालेल्या आंदोलनावरूनही आज राज्यात खडाजंगी सुरू आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपकडे बोट दाखवलं आहे, त्यालाही दरेकरांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. कालचा हल्ला हा संजय राऊतांनीच नियोजनबद्ध केलाय का ? असा खोचक सवाल दरेकरांनी केला आहे संजय राऊत ईडीची कारवाई झाली म्हणून विषय वळवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला आहे. तसेच आम्ही या घटनेचं समर्थन करत नाही. मात्र आम्ही एसटी कर्मचाऱ्यांसोबत आहोत. असेही ते म्हणाले आहेत. तर संजय राऊत भ्रमिष्ट झालेत अशी घणाघाती टीकाही प्रवीण दरेकरांनी केली आहे.
Udyanraje On Pawar : कर्म असतं, शरद पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्याचं उदयनराजेंकडून समर्थन