जागतिक पातळीवरुन लस खरेदीसाठी मुंबई महापालिकेच्या हालचाली, पडताळणी करण्याच्या आदित्य ठाकरेंच्या सूचना
लसींची जागतिक पातळीवरुन खरेदी करण्याच्या अनुषंगाने शक्यता पडताळून पाहण्याच्या सूचना मुंबई महापालिकेला देण्यात आल्या आहेत.
मुंबई : मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. पण लसीच्या तुटवड्यामुळे लसीकरण मोहिमेत अडथळा निर्माण होतोय. मुंबईत लसींची पुरेशी उपलब्धता होण्याच्या दृष्टीनं लसींची जागतिक पातळीवरुन खरेदी करण्याच्या अनुषंगाने शक्यता पडताळून पाहण्याच्या सूचना मुंबई महापालिकेला देण्यात आल्या आहेत. तशी माहिती मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिलीय. शहरातील लसीकरण वेगाने आणि परिणामकारक होण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत यासंदर्भात चर्चा केल्यानंतर महापालिकेला सूचना देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. (BMC testing to procure vaccines globally)
सध्या कोरोना प्रतिंबधक लसीसाठी स्मार्टफोनद्वारे संबंधीत ॲपवर नोंदणी करावी लागते. पण या तंत्रज्ञानाची माहिती नसलेले नागरिक तसेच जे कोविन अॅप ऑपरेट करू शकत नाहीत अशा नागरिकांनाही लस सुलभरित्या मिळावी याकरिता एक पद्धती तयार करण्यावर देखील आम्ही काम करत आहोत, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.
Looking at the need for adequate vaccines to ensure that vaccination is swift & efficient, after discussing the issue with CM Uddhav Thackeray ji, as guardian minister of Mumbai, we have asked @mybmc to explore possibilities of global procurement of vaccines. (1/n)
— Aaditya Thackeray (@AUThackeray) May 10, 2021
‘लसीकरण केंद्र वाढवण्याचे प्रयत्न सुरु’
याशिवाय मुंबईची लसींची अधिकची गरज पाहता शहरात लसीकरण केंद्र वाढविण्याचे प्रयत्न चालू आहेत. मुंबईतील प्रत्येक वॉर्डमध्ये लसीकरण केंद्र सुरु करण्यासह शहरातील प्रत्येक पालिका झोनमध्ये एक ड्राईव्ह-इन लसीकरण केंद्र सुरु करण्याचा निर्णय महापौर किशोरी पेडणेकर आणि महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी घेतला आहे. यासंदर्भात तातडीने अंमलबजावणी झाल्याने आता शहरात लसीकरण केंद्रांची संख्या वाढली आहे. शिवाय ड्राईव्ह-इन लसीकरण मोहीमेमुळे ज्येष्ठ नागरिकांना लस सुलभरित्या मिळण्यासाठी मदत होत आहे, असंही ते म्हणाले.
‘अन्य शहरांनीही ड्राईव्ह-इन लसीकरण मोहीम घ्यावी’
गृहनिर्माण सोसायट्या आणि रुग्णालयांच्या सहभागातून सोसायटी कॉम्प्लेक्समध्ये लसीकरण राबविण्याच्या धोरणासाठी मार्गदर्शक सूचनाही आज महापालिकेने जारी केल्या आहेत, अशी माहितीही आदित्य ठाकरे यांनी दिली. राज्यातीतील इतर सर्व शहरांनीही 65 वर्षापेक्षा जास्त वयाच्या नागरिकांचे सुलभरित्या लसीकरण होण्याच्या दृष्टीने त्या त्या शहरांमध्ये ड्राईव्ह-इन लसीकरण मोहीम घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केलंय.
संबंधित बातम्या :
ठाकरे सरकारची मोठी घोषणा, ‘म्युकरमायकोसिस’चा उपचार आता म.फुले जनआरोग्य योजनेतून होणार
मुंबईत कोरोना रुग्ण डबलिंग रेट वाढला, अंधेरीत 120 दिवसांवर, विभागवार रुग्ण दुपटीचा कालावधी पाहा
BMC testing to procure vaccines globally