Mumbai Local Train: मुंबई एसी लोकलनंतर आता फर्स्ट क्लासच्या तिकिट दरातही कपात, मासिक पासच्या दरात बदल नाही
उन्हाळ्यातील वाढत्या त्रासामुळे मुंबई रेल्वेकडून एसी लोकलची सेवा वाढविण्यात आली होती, मात्र प्रवाशांकडून म्हणावा तसा त्याला प्रतिसाद मिळाला नव्हता.
मुंबईः मुंबई एसी लोकल तिकिटाचे (Mumabi AC local Ticket) दर 50 टक्क्यांनी कमी करण्यात आल्याची घोषणा केली गेली होती, आज 1 मे पासून मुंबई लोकलच्या फर्स्ट क्लासच्या तिकिटाच्या (First Class Ticket) दरातही 50 टक्के कपात (50 percent discount) करण्याची घोषणा करण्यात आली आहे. मुंबईची रक्तवाहिनी समजल्या जाणाऱ्या लोकलमधून प्रवास करणाऱ्यांसाठी आता आणखी एक आनंदाची बातमी देण्यात आली आहे. आता एसी लोकलच्या तिकीट कपातीनंतर फर्स्ट क्लासच्या तिकीट दरामध्येही सुमारे 50 टक्के कपात करण्यात येणार आहे. अवघ्या काही दिवसांमध्ये रेल्वेकडून मिळालेली ही दुसरी भेट आहे.
महाराष्ट्र दिनादिवशीच आणखी एक भेट
रेल्वे प्रशासनाकडून काही दिवसांपूर्वच एसी लोकलच्या तिकीटामध्ये कपात करण्यात आली होती. एसी लोकलच्या तिकीट दर 50 टक्क्यांनी कमी करण्यात आल्यानंतर आता रेल्वेने फर्स्ट क्लासच्या तिकीट दरातही कपात करत रेल्वेप्रवाशांना महाराष्ट्र दिनादिवशीच आणखी एक भेट देण्यात आली आहे. तिकीट दरांची ही घोषणा मुंबई रेल्वे बोर्डाकडून करण्यात आली आहे.
प्रवाशांकडून थंडा प्रतिसाद
उन्हाळ्यातील वाढत्या त्रासामुळे मुंबई रेल्वेकडून एसी लोकलची सेवा वाढविण्यात आली होती, मात्र प्रवाशांकडून म्हणावा तसा त्याला प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यातच एसी लोकलचे दर कमी करण्याची मागणीही रेल्वे प्रवाशांकडून होत होती. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना परवडतील असे दर मुंबई रेल्वेकडून ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
फर्स्ट क्लासच्या दरात कपात
एसी आणि लोकलच्या फर्स्ट क्लासच्या दरात कपात करण्यात आली असली तरी मात्र एसी लोकल आणि फर्स्ट क्लासच्या मासिक पासच्या दरात कोणतीही कपात केली जाणार नसल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
मासिक पासचे दर जैसे थे
फर्स्ट क्लासच्या मासिक पासचे दर जैसे थेच राहणार आहेत. सध्या फर्स्ट क्लासचं ठाणे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंतचे फर्स्ट क्लासचे तिकीट 140 रुपये असून मासिक पासची किंमत 755 रुपये इतकी आहे. रेल्वेच्या तिकीट दरामधील कपातीच्या मोठ्या निर्णयानंतर 140 रुपयांचं तिकीट आता 85 रुपयांपर्यत म्हणजे सुमारे 50 टक्के कमी होणार आहे.