Mumbai: महालक्ष्मी रेसकोर्सचा सायकल ट्रॅक, वॉक वे 2 आठवड्यात पूर्ण होणार, खुले वाचनालय अन् कलादालनाची सोय!
महालक्ष्मी रेसकोर्सचे सौंदर्य पाहण्यासाठी येणाऱ्या मुंबईकरांना आता या परिसरात लवकरच सुसज्ज सायकल ट्रॅक आणि वॉकवेची सुविधा मिळेल. मुंबई महापालिकेकडून सुरु असलेल्या या प्रकल्पाचे काम दोन आठवड्यात पूर्ण होईल, अशी माहिती अधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आली आहे.
मुंबईः महालक्ष्मी रेसकोर्स (Mahalakshmi Racecourse) हे मुंबईतील प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक. दररोज हजारो लोक महालक्ष्मीच्या (Mahalakshmi) पुलावरून रेसकोर्स न्याहाळण्यासाठी येत असतात. याता मुंबई महापालिका याच रेसकोर्सला लागून असलेल्या वरळी-महालक्ष्मी मार्गावर सुमारे 500 मीटरचा सायकल ट्रॅक आणि वॉक वे बनवण्याचे काम करत आहे. मुंबईकरांचे आरोग्य जपण्यासाठी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या संकल्पनेतून हा ट्रॅक साकारला जातोय.
कसा असेल नवा ट्रॅक?
– रेसकोर्सला लागून असलेल्या महालक्ष्मी रेल्वे पुलाखालील भागापासून ते सेनापती बापट मार्गाला जोडणाऱ्या राखांगी चौकापर्यंतची धोकादायक भिंत तोडली जातेय. – त्या ठिकाणी 500 मीटरचा सायकल ट्रॅक आणि वॉक वे बांधला जाणार आहे. त्यामुळे वरळी-महालक्ष्मीच्या ई.मोझेस मार्गावरूनही रेसकोर्स पाहता येईल. – भिंत तोडल्यानंतर नव्याने बसवण्यात येत असलेल्या ग्रिलच्या बाहेरून सायकल ट्रॅक आणि वॉक वे असेल. – या संपूर्ण परिसरात दिवे लावून तो प्रकाशमान केला जाईल. तसेच तिथे सुरक्षारक्षकही नेमले जातील. त्यामुळे भिकारी तसेच टवाळी करणाऱ्यांचा बंदोबस्त होईल. – या उपक्रमामुळे अनधिकृत पार्किंगला आळा बसेल. – संपूर्ण ट्रॅकवर सीसीटीव्हीची नजर असले.
ट्रॅकवर येणाऱ्यांसाठी कोण-कोणत्या सुविधा?
मुंबई महापालिका या कामासाठी 1 कोटी 22 लाख रुपये खर्च करत आहे. ट्रॅक आणि वॉक वे वर येणाऱ्यांसाठी 10 सीटच्या टॉयलेटची व्यवस्था केली जाईल. या परिसरात खुले वाचनालय बांधण्यात येणार असून त्यात सुमारे 500 मराठी, हिंदी आणि इंग्रजी पुस्तकांचा समावेश असेल. तसेच नवोदित कलाकारांसाठी येथे एक खुले कलादालन असेल. कला दालनात चित्रकार, फोटोग्राफर तसेच इतर कलावंतांना आपली कला अगदी मोफत सादर करता येईल. दालनात चित्र, फोटो विक्रीसाठी ठेवता येतील.
इतर बातम्या-