Maharashtra Mantralaya : मंत्रालयात जाण्यासाठी नवी नियमावली जारी; आता ‘त्या’ पास शिवाय मंत्रालयात प्रवेश नाहीच
Maharashtra Mantralaya Entry New Regulations : सरकारी कामासाठी मंत्रालयात जाताय? तर ही बातमी वाचा...

मुंबई | 27 सप्टेंबर 2023 अक्षय कुडकेलवार : मंत्रालय… मुंबईतील अशी जागा जिथं राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक येतात. आपल्या समस्या, आपले प्रश्न अन् आपली कामं घेऊन येतात. लोकांच्या अडीअडचणी सोडवण्याचं ठिकाण असणाऱ्या या मंत्रालयात जाण्यासाठी आता नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. या नियमावलीनुसार जर तुम्हाला मंत्रालयात प्रवेश करायचा असेल तर पास लागेल. या पासशिवाय तुम्ही प्रवेश करू शकणार नाही. बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यासही परवानगी नसेल. गृहविभागाने मंत्रालयात जाण्यासाठी आखून देण्यात आलेल्या नियमावलीतील महत्वाच्या 10 बाबींवर एक नजर टाकूयात…
दहा महत्वाचे मुद्दे
- मंत्रालयात येणाऱ्या सर्व लोकांना प्रवेश पास बंधनकारक
- मंत्रालयात येणाऱ्यांना गार्डन गेटवर अद्यावत सुरक्षा तपासणी कक्ष
- 15 दिवसात ऑनलाईन पासेस देण्याची सुविधा सुरु करण्याचे निर्देश
- मंत्रालयात यापुढे केवळ मंत्री आणि सचिवांच्याच गाड्यांना प्रवेश असेल
- खासगी गाड्यांना योग्य ती परवानगी घेऊनच प्रवेश दिला जाईल
- बाहेरील खाद्यापदार्थ मंत्रालयात नेण्यास मनाई
- मंत्रालय परिसरात सीसीटीव्हीची करडी नजर असेल
- संरक्षक जाळी ओलांडून प्रवेशाचा प्रयत्न केल्यास अलर्ट संदेश कार्यप्रणाली अॅटिव्ह होईल
- सर्व प्रकारच्या कंत्राटी कामगारांची सीसीटीएनएस यंत्रणेद्वारे तपासणी केली जाईल
- मंत्रालयाच्या टेरेसवर जाण्याचे सर्व मार्ग बंद करण्याच्या सूचना
नियमात बदल का?
मंत्रालयात वारंवार वेगवेगळी आंदोलनं केली जातात. आत्महत्येचे प्रयत्नही केले जातात. हे प्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने नवी नियमावली जारी केली आहे. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याच्या गृहविभागाकडून ही नियमावली जाहीर करण्यात आली आहे. या नव्या नियमावलीनुसार मंत्रालयात येणाऱ्या सर्व व्यक्तींना प्रवेशपास बंधनकारक असेल.
मंत्रालय प्रवेश पास तुम्हाला ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध असेल.मंत्रालयात जायचं असल्यास आपल्याला कोणत्या विभात जायचं आहे. याची माहिती द्यावी लागेल. त्या प्रशासकीय विभागाच्या सचिवांच्यापूर्व परवानगीनेच मंत्रालयात प्रवेश करता येईल. मंत्रालयात गेल्यानंतर ही जबाबदारी मंत्रालय सुरक्षा कक्षाची असेल. पूर्वपरवानगी शिवाय कुणालाही मंत्रालयात प्रवेश करता येणार नाही.
