मुंबई महापालिकेने तिजोरी उघडली, रस्त्यांवर 2200 कोटी, तर कोव्हिड केंद्रांवर 100 कोटी खर्च करणार
मुंबई महापालिका (BMC) मुंबईच्या रस्त्यांसाठी तब्बल 2200 कोटी रुपये खर्च करणार आहे. खड्डे, रस्त्यांची दूरवस्थेवरुन होणाऱ्या टीकेनंतर रस्त्यांची डागडुजी आणि खड्डेविरहीत (Potholes ) रस्त्यांकरिता पालिकेच्या निविदा जाहीर करण्यात आल्या.
मुंबई : मुंबई महापालिका (BMC) मुंबईच्या रस्त्यांसाठी तब्बल 2200 कोटी रुपये खर्च करणार आहे. खड्डे, रस्त्यांची दूरवस्थेवरुन होणाऱ्या टीकेनंतर रस्त्यांची डागडुजी आणि खड्डेविरहीत (Potholes ) रस्त्यांकरिता पालिकेच्या निविदा जाहीर करण्यात आल्या. या कामांमध्ये नागरी क्षेत्रातील रस्त्यांसाठी 700 कोटी तर म्हाडाच्या (Mhada) लेआऊट रस्त्यांकरता 300 कोटी रुपयांच्या खर्चाचा समावेश आहे.
2018 मध्ये म्हाडाच्या रस्त्यांची देखभाल करण्याचं काम पालिकेकडे सोपवण्यात आलं होतं. त्यामुळे पालिका आता म्हाडाच्या रस्त्यांवरही 300 कोटी खर्च करणार आहे.
काही दिवसांपूर्वीच महालिकेनं 1200 कोटी रुपयांच्या निविदा काढल्या होत्या. मात्र, कंत्राटदारानं 30 टक्के कमी रकमेनं निविदा भरल्यानं, कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित झाले होते. त्यामुळे या 1200 कोटींच्या फेरनिविदा काढून, वाढीव 1000 कोटींच्या नव्या कामांच्या निविदाही काढण्यात आल्या आहेत.
जम्बो कोविड केंद्रावर आणखी 100 कोटी खर्च करण्याचा पालिकेचा प्रस्ताव
मुंबईतील जम्बो कोविड सेंटरवर आणखी 100 कोटी खर्च करण्याचा महापालिकेचा प्रस्ताव आहे. यामध्ये आयसीयू, ऑक्सिजन बेड्स, पेडियाट्रिक आयसीयू, डायलिसीस आयसीयू सेवांसाठी खासगी रुग्णालयांची मदत घेतली जाणार आहे.
महापालिकेच्या बीकेसी, दहिसर, सोमय्या मैदान, कांजूरमार्ग, मालाड या पाचही जंबो कोविड सेंटरमध्ये अतिदक्षता, ऑक्सिजन आणि विना ऑक्सिजन बेड्सचे तीन महिने अथवा कोविड- 19 चा प्रादुर्भाव कमी होईपर्यंत, यापैकी जो कालावधी कमी असेल त्या कालावधीत व्यवस्थापन राखण्यासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पण कोणत्याही वैद्यकीय संस्थांना कार्यादेश देण्यात आलेले नाहीत. तिसरी लाट उद्भवल्यास प्रशासनाला तात्काळ मदत उपलब्ध व्हावी यासाठी ही तयारी करुन ठेवली असल्याचं आरोग्य विभागाने स्पष्ट केलं आहे
बीकेसी जंबो कोविड सेंटर
– आयसीयू बेड :- १०८
– नियुक्त वैद्यकीय संस्थेचे नाव :- ओम साई आरोग्य केअर प्रायव्हेट लिमिटेड
– तीन महिन्यांकरता होणार खर्च : ५ कोटी ६३ लाख ६६ हजार २८० रुपये
दहिसर जंबो कोविड सेंटर
– आयसीयू बेड :- १०० – ऑक्सिजनेटेड :- ६१३ – नॉन ऑक्सिजनेटेड :- ११७ – नियुक्त वैद्यकीय संस्थेचे नाव :- लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेस – तीन महिन्यांकरता होणार खर्च :- १४कोटी ०५ लाख ०३ हजार ६८० रुपये
सोमय्या मैदान जंबो कोविड सेंटर
– आयसीयू बेड :- २०० – ऑक्सिजनेटेड :- ७५० – पेडियाटीक आयसीयू :- ५० -पेडियाटीक :- १०० – नियुक्त वैद्यकीय संस्थेचे नाव :- ऍपेक्स हॉस्पिटल,मुलुंड – तीन महिन्यांकरता होणारा खर्च :- २२ कोटी ४७ लाख ७५ हजार रुपये
कांजूरमार्ग जंबो कोविड सेंटर
– आयसीयू बेड :- १५० – ऑक्सिजनेटेड :- १२०० – नॉन ऑक्सिजटेड :- ३०० – पेड्रीयाटीक आयसीयू :- ५० – नियुक्त वैद्यकीय संस्थेचे नाव :- मेडटायटन्स मॅनेजमेंट – तीन महिन्यांकरता होणारा खर्च :- २८ कोटी २३ लाख ३९ हजार रुपये
मालाड जंबो कोविड सेंटर
– आयसीयू बेड :- १९० – ऑक्सिजनेटेड :- १५३६ – नॉन ऑक्सिजटेड :- ३८४ – डायलिसीस आयसीयू :- २० – ट्राएज (आयसीयू) :- ४० – नियुक्त वैद्यकीय संस्थेचे नाव :- रुबी ऍलकेअर सर्विसेस – तीन महिन्यांकरता होणारा खर्च :- ३४ कोटी ५१ लाख ८७ हजार २६० रुपये
संबंधित बातम्या
मुंबईला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका नाही; पालिकेचा न्यायालयात दावा