‘डोंगरीतल्या बाबा मस्जिदमध्ये…’; मुंबई पोलिसांना आलेल्या ‘त्या’ फोनमुळे खळबळ!
मुंबई पोलिसांना आलेल्या फोन कॉलमुळे खळबळ उडाली, मुंबईतील कायम चर्चेत राहणारा डोंगरी भागात बाबा मस्जिदमध्ये दहशतवादी घुसल्याचा फोन आला. त्यानंतर पुण्यातही एक फोन कॉल आला होता. त्यानंतर पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले.
मुबंई : राज्यात भरदिवसा गोळीबाराच्या घटना घडत असल्याने सगळीकडे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. कोण कधी कोणावर गोळ्या मारेल, प्राणघातक हल्ला करेल काही सांगता येत नाही. दहिसरमध्ये ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. सत्ताधारी पक्षातील आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस स्टेशनमध्ये केलेला गोळीबार, नगरमध्ये शिवसेनेच्या नगरसेवकावर गावठी कट्ट्याने केलेला हल्ल्याच्या प्रयत्न या घटनांमुळे दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. अशातच मुंबई पोलिसांना आलेल्या एका फोन कॉलने पोलीस दलात खळबळ उडाली.
नेमकं कोणी केला फोन?
डोंगरीतल्या बाबा मस्जिदमध्ये रायफल घेऊन काही दहशतवादी घुसल्याचा मुंबई पोलिसांना कॉल आला. पोलिसांना कंट्रोल रूममधून तपासणी केल्यावर असं काहीही घडलं नसल्याचं समोर आलं. पोलिसांनी फोन करणाऱ्या व्यक्तीचा कॉल ट्रेस केला आणि त्याला ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी 83 वर्षीय व्यक्तीस पीसीओ बुथवरून केला होता. भगवान रामचंद्र भापकर असं फोन करणाऱ्या आरोपीचं नाव आहे.
पुण्यातही धमकीचा फोन
पुण्यात पुन्हा बॉम्ब स्फोटाची धमकी देण्यात आली होती. पुण्यातील शिवाजी नगर आणि पुणे स्टेशनसह पिंपरी चिंचवड मध्ये बॉम्बस्फोट करण्याची धमकी दिली होती. पुणे पोलिसांना कॉल करत पुणे शहरात बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देण्यात आली होती. धमकीचा कॉल करणारा माथेफिरू असून अफवा पसरवल्याचं पोलीस तापासात उघड झालं. कॉल करणारा व्यक्ती हा हडपसर भागात राहणारा असून तो माथेफिरू असल्याचं पुणे पोलिसांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
दरम्यान, आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमुळे राज्यासह देशात कडेकोट पोलीस बंदोबस्त आहे. देशात कोणताही दहशतवादी हल्ला होणार नाही याची काळजी गुप्तहेर यंत्रणांना अलर्ट रहावं लागणार आहे. निवडणुका तोंडावर असल्याने काहीही होऊ शकत. त्यामुळे कोणत्याच खात्याला गहाळ राहून चालणार नाही.