सामनातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका; म्हणाले, मोदी परिवाराचा फुगा!
Saamana Editorial on PM Narendra Modi Ka Pariwar : मोदी परिवाराचा फुगा!; सामनातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका... आजच्या सामनाच्या अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. आजच्या सामनात नेमकं काय म्हणण्यात आलंय? वाचा सविस्तर....
मुंबई | 06 मार्च 2024 : यंदा देशात सार्वत्रिक लोकसभा निवडणूक होऊ घातली आहे. यात वेगवेगळी प्रचार स्टॅटर्जी वापरली जाणार आहे. भाजपच्या सर्व नेत्यांनी आपल्या सोशल मीडियावर मोदी का परिवार असा उल्लेख केला आहे. यावर विरोधक टीका करत आहेत. आजच्या सामनाच्या अग्रलेखातून यावर भाष्य करण्यात आलं आहे. मोदी परिवाराचा फुगा! शीर्षकाखाली आजचा सामनाचा अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे. ‘मोदी का परिवार’चा मोदींनी फुगविलेला फुगा जनताच उद्या तो फोडणार आहे!, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.
सामनाचा अग्रलेख जसाच्या तसा
स्वागताच्या हारामध्येही ज्यांना कोणी दुसरा नेता आलेला चालत नाही ते पंतप्रधान मोदी जेव्हा ‘मेरा देश, मेरा परिवार’ असा आव आणतात, तेव्हा हसायचे की डोक्यावर हात मारून घ्यायचा, हा प्रश्न पडतो. विरोधी पक्षांतील परिवारवादावर बोलणाऱ्या पंतप्रधानांना दुसऱ्यापक्षांमधील कुटुंबशाही भाजप परिवारात आलेली चालते, मात्र दहा वर्षांच्या मोदी राजवटीनंतरही विस्थापितच राहिलेले कश्मिरी पंडित या परिवाराचे सदस्य आजही नाहीत. रक्तरंजित मणिपूरही ‘मोदी का परिवार’मध्ये नाही.
मोदी सांगत असलेल्या त्यांच्या कुटुंबाचे खरे रूप हे असे आहे. ‘मेरा देश मेरा परिवार’ हा फक्त त्यावर दिलेला मुलामा आहे. ज्या 140 कोटी जनतेला पंतप्रधान मोदी त्यांचे कुटुंबीय म्हणतात तिलाही हा मुलामा आणि आतला खरा चेहरा आता लक्षात आला आहे. ‘मोदी परिवार’ हा मोदींनीच फुगविलेला फुगा आहे आणि जनताच उद्या तो फोडणार आहे!
भारत देश हाच आपला परिवार आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी पुन्हा जाहीर केले. त्यात त्यांनी नवीन काय सांगितले? ‘देशातील 140 कोटी जनता हेच माझे कुटुंब’ ही मोदी यांची आवडती टेप आहे. मागील नऊ-दहा वर्षांत त्यांनी ती उठता बसता वाजवली आहे आणि त्यामुळे ती आता घासली गेली आहे. देशाची 140 कोटी जनतादेखील ती ऐकून कंटाळली आहे. मात्र हे समजून घेतील ते मोदी कसले? त्यामुळे ‘मेरा भारत, मेरा परिवार’ हे पालुपद काही ते सोडायला तयार नाहीत.
सोमवारी तेलंगणातील एका कार्यक्रमात त्यांनी ते पुन्हा म्हटले. वास्तविक, पंतप्रधान हे संपूर्ण देशाचे पालकच असतात. मोदी यांच्या आधीचे सगळे पंतप्रधानही या देशाचे कुटुंबप्रमुख म्हणूनच वावरले. तेव्हा देश हेच माझे कुटुंब असे म्हणणे म्हणजे आपण खूप वेगळे काहीतरी करीत आहोत, असे कोणी समजण्याचे कारण नाही. किंबहुना तेच तुमचे कर्तव्य असायला हवे.
जनतेने सलग दोनदा त्याच विश्वासाने तुम्हाला निवडून दिले. मात्र हा विश्वास तुम्ही किती सार्थ ठरविला हा खरा प्रश्न आहे. देश म्हणजेच कुटुंब वगैरे फक्त तोंडी लावण्यापुरते आहे. प्रत्यक्षात तुमचे कुटुंब म्हणजे तुमचे उद्योगपती मित्र, तुमच्या सभोवती असलेले कोंडाळे हेच आहे. सोशल मीडियावरून तुमचा उदो उदो करणाऱ्या सायबर टोळ्या हे तुमचे कुटुंब आहे.