Sanjay Raut : दिल्लीने मुख्यमंत्री शिंदे यांचं पायपुसणं केलंय; संजय राऊत यांचा घणाघात
Sanjay Raut on CM Eknath Shinde PM Narendra Modi : संजय राऊत यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डी दौऱ्यावरही संजय राऊत यांनी टीका केली आहे. तसंच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही संजय राऊत बोलले आहेत. आजच्या पत्रकार परिषदेत संजय राऊत काय म्हणाले? पाहा..
गणेश थोरात, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, मुंबई | 26 ऑक्टोबर 2023 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. आमदार अपात्रताबाबत आणि मराठा आरक्षणाबाबत अमित शाह यांच्याशी त्यांनी चर्चा केल्याची माहिती आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या दौऱ्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. एकनाथ शिंदे म्हणतात की मी शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारा मुख्यमंत्री आहे. बाळासाहेबांचा स्वाभिमानी शिवसैनिक आहे, असं बोलणाऱ्या मुख्यमंत्री शिंदे यांचं दिल्लीने पायपुसणं केलं आहे, असं संजय राऊत म्हणालेत.
वारंवार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दिल्लीला जात आहे. या सरकार दिल्लीतील पायपुसणं केलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज एकदाच दिल्ली आणि आग्राला गेले आणि सर्व खानांना धडा शिकून आले होते. चहा पिऊ का? पाणी पिऊ का? हे विचारण्यासाठी तुम्हाला वारंवार दिल्लीत जावं लागतं. ही लाजिरवाणी बाब आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावर टीका केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज शिर्डी दौऱ्यावर आहेत. यावर राऊतांनी टीका केली आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत का? महाराष्ट्रात ते पाहावे लागेल. सरकार बदलत आहे. राष्ट्रपती शासन लागत आहे. काही होऊ शकतं. नरेंद्र मोदी येणार साईबाबा दर्शन घेणार, भाषण करणार, स्वतः ते एक बाबा आहेत, असं म्हणत संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांच्या शिर्डी दौऱ्यावर टीका केली आहे.
कायदेशीर सरकारच्या मंचावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत. महाराष्ट्रामध्ये आपण हरत आहोत. जो जुगार ते हरत आहेत. एका नैराश्यातून ते महाराष्ट्रात येत आहेत. त्यांना भीती वाटत आहे. त्यामुळे पंतप्रधानांना वारंवार बोलावं लागतं. देशाचे पंतप्रधान आहेत ते मणिपूर आणि जम्मू काश्मीर सोडून कुठेही जाऊ शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठे जाऊ शकतात, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.
मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे. मात्र यावरती कुठलाही तोडगा सरकारने काढला नाही. हा तोडगा केंद्र सरकार काढणार या अगोदर देखील मी म्हणालो होतो. मनोज जरांगे यांना मोदी समोर बसवले पाहिजे. जे काय मागण्या आहेत त्या समोर बसून सांगितल्या पाहिजेत, असंही संजय राऊत म्हणालेत.