अनेक हायप्रोफाईल खटल्यांची सुनावणी अंतिम टप्प्यात असताना मुंबई सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांची बदली
अनेक हायप्रोफाईल खटल्यांची सुनावणी अंतिम टप्प्यात असताना मुंबई सत्र न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांची बदली करण्यात आली आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. न्यायाधीश राहुल रोकडे यांनी विधानसभा अध्यक्षांना 3 हजारांचा दंड ठोठावला होता. तसेच मंत्री भुजबळांना वॉरंटचा इशारा दिला होता. असे अनेक हायप्रोफाईल खटले रोकडे यांच्या न्यायालयासमोर सुरु होते.
मुंबई सत्र न्यायालयातील न्यायाधीश राहुल रोकडे यांची बदली झाली आहे. रोकडे अनेक सत्ताधारी आमदार आणि मंत्र्यांविरोधातील खटल्यांचे न्यायाधीश होते. शिखर बँक घोटाळा, महाराष्ट्र सदन, भोसरी भुखंड घोटाळा या प्रकरणाचे खटले रोकडे यांच्या काळात अंतिम टप्प्यात होते. असं असताना त्यांची बदली करण्यात आली आहे. न्यायाधीश राहुल रोकडे शिखर बँक घोटाळा प्रकरणी 12 जुलैला सुनावणी घेणार होते. याच दरम्यान रोकडे यांची दिंडोशी येथील सत्र न्यायालयात बदली झाली आहे. न्यायाधीश राहुल रोकडे यांनी नुकतंच एका सुनावणीवेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना एका प्रकरणात 3 हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. तसेच राज्य मध्यवर्ती ग्रंथालय घोटाळा प्रकरणी मंत्री छगन भुजबळ यांना वॉरंटचा इशाराही दिला होता. विशेष म्हणजे शिखर बँक घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांनी अजित पवारांना क्लिन चिट दिली आहे. पण त्याविरोधात ईडीने कोर्टात धाव घेतली आहे. याच प्रकरणी आता येत्या 12 जुलैला सुनावणी होणार होती. पण त्याआधीच न्यायाधीश राहुल रोकडे यांची बदली करण्यात आली आहे.
दरम्यान, राहुल नार्वेकर यांना दंड ठोठावण्यात आलेलं प्रकरण काहीसं वेगळं होतं. महाविकास आघाडी सरकार असताना वीजदरवाढीविरोधात भाजपकडून आंदोलन करण्यात आलं होतं. या आंदोलनादरम्यान बेस्टच्या महाव्यवस्थापकांना मारहाण करण्यात आली होती. या मारहाण प्रकरणी भाजपच्या 20 पदाधिकाऱ्यांविरोधात मुंबई सत्र न्यायालयात खटला सुरु होता. या खटल्यात 20 पदाधिकाऱ्यांमध्ये राहुल नार्वेकर यांचंही नाव होतं. पण राहुल नार्वेकर या प्रकरणाच्या सुनावणीत सातत्याने गैरहजर राहिल्याने त्यांना न्यायाधीशांनी 3 हजारांचा दंड ठोठावला होता.
राहुल रोकडे यांच्या न्यायालयात हायप्रोफाईल प्रकरणांची सुनावणी
- न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यासमोरील सर्वात महत्त्वाचा खटला म्हणजे शिखर बँक घोटाळा प्रकरण. या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचंदेखील नाव आहे. या प्रकरणाचा खटला आता अंतिम टप्प्यावर आला होता. विशेष म्हणजे राहुल रोकडे हे येत्या 12 जुलैला या प्रकरणावर सुनावणी घेणार होते. पण या सुनावणीआधीच त्यांची दिंडोशी येथील सत्र न्यायालयात बदली झालीय.
- राहुल रोकडे यांच्यासमोर मंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधातील खटला देखील सुरु होता. भुजबळ यांच्या विरोधातील महाराष्ट्र सदन घोटाळा आणि कलिना मध्यवर्ती ग्रंथालय घोटाळा यांचादेखील समावेश होता.
- विशेष म्हणजे आमदार एकनाथ खडसे यांच्यावर आरोप झाल्या प्रकरणी तसेच ते आरोपी असलेल्या भोसरी भुखंड घोटाळ्या प्रकरणाचा खटलादेखील राहुल रोकडे यांच्याच खंडपीठासमोर सुरु होता.
- याशिवाय माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधातील प्रकरणही राहुल रोकडे यांच्यासमोर न्यायप्रविष्ठ होतं.
- माजी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या विरोधातील हनुमान चालिका प्रकरणाचा खटलाही अद्याप प्रलंबित होता. हा खटलाही आता सुनावणीसाठी अंतिम टप्प्यात होता. असं असताना न्यायाधीश राहुल रोकडे यांची बदली करण्यात आली आहे.