पटोले-थोरातांमध्ये मनोमिलन, काँग्रेसमधील अंतर्गत वादाची ठिणगी विझली?
पटोले आणि थोरातांमध्ये अखेर मनोमिलन झालं. काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत, थोरातही आले आणि पटोलेंच्या शेजारीच बसून वाद मिटल्याचं दाखवून दिलं
मुंबई : आता बातमी पटोले-थोरातांची. आधी मतभेद आणि नंतर राजीनाम्यापर्यंत पोहोचलेलं प्रकरण आता शांत झालंय. कारण थोरातांची नाराजी दूर झालीय…पटोले आणि थोरातांमध्ये कसं मनोमिलन झालंय पाहुयात
पटोले आणि थोरातांमध्ये अखेर मनोमिलन झालं. काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत, थोरातही आले आणि पटोलेंच्या शेजारीच बसून वाद मिटल्याचं दाखवून दिलं. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनीही, काँग्रेसमध्ये कोणताही वाद नसून काँग्रेस एकसंघ असल्याचं म्हटलंय.
नाशिकच्या पदवीधर निवडणुकीत, थोरातांचे भाचे सत्यजित तांबेंसोबत जे काही घडलं त्यानंतर थोरात नाराज झाले होते. पटोलेंची तक्रार त्यांनी काँग्रेस हायकमांडकडे केली होती ऑनलाईन कार्यक्रमातून स्वत: थोरातांनी सांगितलंही होतं. पण आता पक्षांतंर्गत ज्या काही गोष्टी असतात त्यावर मार्ग निघतो असं सांगून थोरात पटोलेंसोबतच्या वादावर पडदा टाकलाय
पटोलेंसोबतच्या वादानंतर, थोरातांनी विधीमंडळाच्या नेते पदाचा राजीनामाही दिल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर काँग्रेसचे प्रभारी एच के पाटलांनी थोरातांची नाराजी दूर केली. मात्र पटोलेंनी पत्रकारांनाच पत्र किंवा राजीनाम्याची कॉपी असेल तर दाखवा, असं म्हणत एकप्रकारे थोरातांनी राजीनामा दिलाच नव्हता असं सांगण्याचा प्रयत्न केलाय.