मुंबई: भाजपने आज राज्यभरात ओबीसींच्या आरक्षणावरून राज्य सरकारच्या निषेधार्थ आंदोलन सुरू केलं आहे. भाजपच्या या आंदोलनावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसच ओबीसींच्या आरक्षणाचे मारेकरी आहेत. त्यामुळे भाजपने या दोघांविरोधात आधी आंदोलन करावे. राज्य सरकार विरोधातील आंदोलनाची नौटंकी बंद करावी, असा घणाघाती हल्ला नाना पटोले यांनी चढवला आहे. (nana patole taunt bjp over agitation for obc reservation)
नाना पटोले यांनी मीडियाशी बोलताना भाजपच्या आंदोलनाची खिल्ली उडवली. केंद्र सरकारकडे जातीनिहाय जनगणनेची आकडेवारी असतानाही ती माहिती राज्य सरकारांना देत नाही. सुप्रीम कोर्टानेही ओबीसी आरक्षणाच्या सुनावणी दरम्यान ओबीसींचा इम्पीरिकल डेटा मागितला असता केंद्र सरकारने ते देण्याचे जाणीवपूर्वक टाळले. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत यांना पत्र लिहून ओबीसींचा इम्पिरीकल डेटा देण्याची मागणी केली पण केंद्राने तो दिला नाही. केंद्राने ओबीसींचा डेटा दिला नाही, त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयात ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द होण्याची नामुष्की ओढवली. या प्रकरणात मोदी सरकार जेवढे जबाबदार आहे तेवढेच फडणवीस सरकारही जबाबदार आहे. 2017 साली नागपूर जिल्हा परिषदेची निवडणूक फडणवीस यांनी एक परिपत्रक काढून पुढे ढकलली. नंतर इतर जिल्हा परिषदाही कोर्टात गेल्या, यातून गुंता वाढत गेला आणि परिणामी आरक्षण धोक्यात आले, असा दावा पटोले यांनी केला आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या भाजपची विचारधाराच आरक्षण विरोधी असून ओबीसींचे राजकीय आरक्षण घालवून ओबीसी समाजाला सत्तेपासून वंचित ठेवण्याचा डाव आहे. भाजपाच्या या भूमिकेमुळेच आरक्षणाची गुंतागुंत वाढली असताना त्याचे खापर मात्र राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडी सरकारवर फोडण्यासाठी आंदोलनाचा कांगावा ते करत आहेत. भाजपाचे हे ढोंग जनतेला विशेषतः बहुजन समाजाच्या लक्षात आले आहे. भाजपाचे आंदोलन हा केवळ फार्स असून आपण केलेले पाप दुसऱ्याच्या माथी मारण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे, असेही ते म्हणाले.
भाजपाच्या बेजबाबदारपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण संकटात आले असून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील जवळपास 55 ते 56 हजार जागांवर पाणी सोडावे लागणार आहे. ओबीसी समाजातील नेतृत्व संपुष्टात आणण्याचे पाप भाजपाने केले आहे. पाच वर्ष सत्तेत असताना फडणवीसांनी झोपा काढल्या आणि आता आंदोलन करून ओबीसी समाजाची दिशाभूल केली जात आहे. भाजपाला जर ओबीसी समाजाचा खराच कळवळा असता तर ही वेळच येऊ दिली नसती. त्यांचे षडयंत्र उघडे पडल्यामुळे आपल्यालाच ओबीसी समाजाच्या हिताची चिंता असल्याचे भासवण्यासाठी हा सर्व खटाटोप सुरू आहे, असं त्यांनी सांगितलं. (nana patole taunt bjp over agitation for obc reservation)
VIDEO | सुपरफास्ट 100 न्यूज | 15 September 2021 https://t.co/JEwzAdQ0pt #MorningBulletin | #MorningHeadlines | #TV9Marathi | #BreakingNews | #LatestUpdates
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 15, 2021
संबंधित बातम्या:
दिल्लीत जेरबंद केलेला दहशतवादी धारावीतील, गृहमंत्री अॅक्शन मोडमध्ये; तातडीने बोलावली बैठक
(nana patole taunt bjp over agitation for obc reservation)