शरद पवार यांना अभिप्रेत राज्य कारभार लवकरच दिसेल, नारायण राणे यांचं मोठं विधान; असं का म्हणाले राणे?
कोकण भूमी प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने सिंधदुर्ग भवन येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते, आंबा महोत्सव 2023 चे उद्घाटन झाले. यावेळी नारायण राणे यांनी उद्योजकांना केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून पूर्ण सहकार्य आणि मदत करण्याचे आश्वासन दिले.
मुंबई : अलिकडच्या काळात संभाजीनगरला काही प्रकार घडला. मुंबईतील मालवणीतही काही प्रसंग घडला. या दोन्ही ठिकाणी राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे. दोन्ही घटनेला धार्मिक स्वरूप आहे का असं वाटायला लागलं आहे, असं विधान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलं होतं. शरद पवार यांच्या या विधानावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. शरद पवार यांनी चिंता व्यक्त करू नये. त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.
नारायण राणे मीडियाशी संवाद साधत होते. बोलताना संयम असावा. कुणाचीही मन दुखतील असं बोलायला नको असं मला वाटतं. पवारांनी चिंता व्यक्त केली. सरकार त्यांचं राहिलेलं नाही. त्यांचं सरकार असताना लोकांना जास्त चिंतीत टाकलं होतं. चिंताग्रस्त लोकं होती. कारण राज्याला मुख्यमंत्रीच नव्हता. तुम्ही म्हणाला उद्धव ठाकरे कोण होते? तर ते मातोश्रीचे मुख्यमंत्री होते, अशी टीका करतानाच शरद पवार यांना अभिप्रेत असं राज्य आणि कारभार लवकरच दिसेल, असं नारायण राणे म्हणाले.
कोकण प्रगत झालाय
निलेश राणे यांनी आयोजित केलेल्या आंबा महोत्सवाचं नारायण राणे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. या आंबा महोत्सवाचंही त्यांनी कौतुक केलं. निलेश राणे यांनी चांगला उपक्रम राबवला आहे. गेली अनेक वर्ष मी कोकणाला प्रगतीकडे नेण्याचा प्रयत्न केला. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र यांच्या तुलनेत कोकण प्रगत झालाय. आजचा विषय आंब्याच्या ब्रँडीगचा आहे. आजकाल कृषी विद्यापीठ आहेत. मात्र आंबा कसा पिकवावा, बायप्रॉडक्ट कसे करावे याचे प्रशिक्षण दिले जात नाही, असं राणे म्हणाले.
कर्ज कर्ज कधीपर्यंत बोलणार?
मी अमूल प्रॉडक्शन बघितले. 30 लिटरच्या दुधाचे चीज, बटर करुन 150 रुपये कमवते. मात्र आंबा आपण तसा आहे तसा विकतो. त्याचे व्हॅल्यू अॅडेड प्रॉडक्ट करत नाही. कोकणी माणसाने बायप्रॉडक्टचे ज्ञान कधी घेतले नाही. हे शिका ना.. कर्ज कर्ज कधीपर्यंत बोलणार? चीनमधे एक मशीन एक लाख बॉटल बनवते. मात्र आपल्याकडे पाच हजार पेक्षा जास्त बॉटल एका दिवसात निघेल. कर्ज हा प्रश्न एका दिवसात सुटेल. मात्र कायम स्वरुपी मार्ग हवा, असंही त्यांनी सांगितलं.
पॅकेज जाहीर करायला सांगतो
मी 1995 मध्ये मासे पकडायला एक ट्रॉलर घेतला होता. खलाशी काळोख पडत गेला की भाव कमी करत आणतो. मुंबईत दोन हजाराला पापलेट मिळतो. मात्र जाग्यावर 200 रुपयाला जातो. आपण साडे सात वाजली की काम बंद करतो. कारण आपल्याला दुसरी कामं असतात. हे सर्व बंद करु शांततेने विचार केला पाहिजे. जपानमध्ये 750 ग्रॅम आंब्याची किंमत 1 लाख 30 हजार आहे. माझ्याकडे या. मी सर्व मदत करतो. एकदाच चांगला मार्ग काढू. सर्व मदत करतो. मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना भेटतो. एक पॅकेज जाहीर करायला लावतो, असंही त्यांनी सांगितलं.