BIG BREAKING | महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड, शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी ‘वर्षा’वर दाखल
महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड सध्याच्या घडीला घडत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी त्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी दाखल झाले आहेत.
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड सध्याच्या घडीला घडत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी त्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी दाखल झाले आहेत. महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर शरद पवार हे पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी गेले आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणातील ही खळबळजनक घटना मानली जातेय. कारण शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे काही कामानिमित्ताने परदेशात गेले आहेत. असं असताना अचानक शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले आहेत. या भेटीमागचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. पण या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
भेटीमागचं नेमकं कारण काय?
महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे नेमक्या काय घडामोडी घडत आहेत, याचा थांगपत्ताच लागत नाहीय. कारण अचानक काहीतरी अशा घडामोडी घडून येताय की ज्याची सहजासहज कल्पना करता येणार नाही. महाराष्ट्रात सत्तांतर घडून जवळपास 10 पहिने पूर्ण होत आहेत. या दरम्यानच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली नाही. पण आज अचानक भेट होताना दिसतेय.
देशातील सर्व विरोधी पक्षांची एकमोट बांधण्याचे प्रयत्न केले जात आहेत. यासाठी शरद पवार महत्त्वाचे नेते आहेत. शरद पवार यांनी अनेकदा भाजप-शिंदे सरकारवर उघडपणे टीका केली आहे. असं असताना उद्धव ठाकरे परदेशात गेलेले असताना शरद पवार यांनी अचानक मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.
भेटीचा पहिला व्हिडीओ समोर
शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दाखल झालेले दिसत आहेत. ते खुर्चीवर बसताना दिसत आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शरद पवार यांचं स्वागत करताना या व्हिडीओत दिसत आहेत. दुसरीकडे शरद पवार यांच्या हातात काही कागदपत्रे दिसत आहेत. त्यामुळे या भेटीमागे काहीतरी महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
शरद पवार यांनी विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. पण शरद पवार यांना या भेटीतून नेमका राजकीय संदेश काय द्यायचा आहे याबाबत विविध चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळे या भेटीला जास्त महत्त्व प्राप्त झालेलं आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या भेटीनंतर शरद पवार प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देणार असल्याची माहिती मिळत आहे.