सर्वात मोठी बातमी, अजित पवार यांना विरोधी पक्षनेतेपद नकोय, भर कार्यक्रमात केली मोठी मागणी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुंबईत आज कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात भाषण करताना अजित पवार यांनी पक्षाकडे महत्त्वाची मागणी केली. विशेष म्हणजे त्यांनी आपल्याला विरोधी पक्षनेते पदाच्या जबाबदारीतून मुक्त करा, असं अजित पवार म्हणाले.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पार पडलेल्या कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांना पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी दिली. शरद पवार यांनी याबाबत कार्यक्रमात घोषणा केलेली. शरद पवार यांनी त्यावेळी अनेक नेत्यांवर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सोपवल्या. पण या नेत्यांमध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचं नाव नव्हतं. त्यामुळे अजित पवार नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं. दुसरीकडे अजित पवार यांच्याकडे विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी असल्याने त्यांना पक्षाची संघटनात्मक जबाबदारी देण्यात आलेली नसल्याचं स्पष्ट करण्यात आलेलं. पण आता स्वत: अजित पवार यांनी याबाबतची मागणी केली आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुंबईत आज कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात भाषण करताना अजित पवार यांनी आपली इच्छा व्यक्त केली. यावेळी त्यांनी आपल्याला विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी नको. तर पक्षाच्या संघटनात्मक बांधणी विषयी जबाबदारी द्या. आपल्याला कोणतीही जबाबदारी मिळाली तरी आपण तिला न्याय देण्याचा प्रयत्न करु, असं अजित पवार भर कार्यक्रमात म्हणाले आहेत.
अजित पवार नेमकं काय म्हणाले?
“मला विरोधी पक्षनेत्यामध्ये फार काही इंटरेस्ट नव्हता. पण आमदारांनी आग्रह केला. त्यांनी सह्या केल्या. नेतेमंडळींनी देखील सांगितलं की तू विरोधी पक्षनेता होता. त्यामुळे मी त्यांच्याखातर या पदाची जबाबदारी घेतली. मी एक वर्ष विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी सांभाळली आहे. ते सांभाळत असताना काहींचं म्हणणं आहे की, तू कडक वागत नाही. आता त्यांची गचोडी धरु का? पण आता बस झालं”, असं अजित पवार म्हणाले. “मला त्यातून मुक्त करा आणि संघटनेची जबाबदारी द्या. मग कशापद्धतीने पक्ष चालतो ते बघा. अर्थात हा नेतेमंडळींचा अधिकार आहे. पण माझी इच्छा आहे. बाकी अनेकजण वेगवेगळ्या इच्छा व्यक्त करतात. मी आज माझी इच्छा व्यक्त केली आहे. आजपर्यंत पक्षाने जी जबाबदारी दिली ती मी पार पाडलेली आहे. मला संघटनेत कोणतंही पद द्या. तुम्हाला जे पद योग्य वाटेल ते द्या. त्या पदाला योग्य न्याय मिळवून देईन”, असं अजित पवार म्हणाले.
अजित पवार यांनी कार्यकर्त्यांचे कान टोचले
यावेळी भाषण करताना अजित पवार यांनी कार्यकर्त्यांचे देखील कान टोचले. “आपण आपल्या एकट्याच्या ताकदीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यात सत्तेवर निवडून येऊ शकलेला नाहीय. यासाठी आपणच कुठेतरी कमी पडलो आहोत. आपण विदर्भामध्ये कमी पडतो. आपण मुंबईत कमी पडतो. मुंबईत आजदेखील काय अवस्था आहे? आपण 25 वर्षे पूर्ण करुन 26 व्या वर्षात पदार्पण केलंय. पण अजूनही मुंबईचा अध्यक्ष नाहीय. आपल्याला दिल्लीला कुणाला विचारायला जायचंय?”, असा सवाल त्यांनी केला.
“आपल्याला निर्णय तर महाराष्ट्रातच घ्यायचाय. इथे आपल्या राष्ट्रवादी भवनमध्ये घ्यायचा आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि इतर मान्यवरांशी चर्चा करायची आहे. काय आपण कमी पडलो? कशामुळे कमी पडलो? कोकणात, पश्चिम महाराष्ट्रात आपण वर्चस्व निर्माण केलं. उत्तर महाराष्ट्रातही आपण चांगलं यश मिळवलं. आपण आज आनंदाचा दिवस साजरा करत असताना थोडं पाठीमागे वळून आत्मचिंतन करण्याची गरज आहे”, असं मत अजित पवार यांनी मांडलं.
अजित पवार यांनी यावेळी घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्याचे कान टोचले. तुझ्या वॉर्डात राष्ट्रवादीचा नगरसेवक आहे का? किंवा ग्रामपंचायत निवडणुकीत सत्ता मिळवली आहे का? असा प्रश्न अजित पवार यांनी केला. ॉ
‘भाकरी फिरलीच पाहिजे’
“आज नवीन कार्यकर्ते पुढे येत आहेत. वेगवेगळ्या विविध सेल काम करत आहेत. आता त्या सेलमध्ये बदल करायचा की नाही? कुठे पस्तीशी आहे ते फार चाळीशीपर्यंत गेलं आहे. आता तिथे बदल करा. मी इतक्या वेळी सांगतो, कुणाचा तिथे इंट्रेस्ट अडकला आहे ते तरी समजू द्या. भाकरी फिरवायची झाली तर फिरलीच पाहिजे”, असं अजित पवार म्हणाले.
“ज्या कार्यक्रमाला काहीतरी मोठं आणि वजनदार गिफ्ट दिलं तर समजावं इथे बराच काहीतरी घोटाळा झालेला आहे. त्या वजनानेच मी किंवा नेतेमंडळी दबलो पाहिजे, असले प्रकार चालतात. जो काम करतो तो कामच करत राहतो”, असं अजित पवार म्हणाले.