BREAKING | हसन मुश्रीफ यांच्या अडचणी वाढवणारी बातमी, मुलगा नावेद मुश्रीफ ईडी चौकशीला सामोरं जाणार?
ईडीने हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नावेद मुश्रीफ यांना चौकशीचे समन्स बजावले आहेत. पण ते समन्सला उत्तर देत नसल्याचा दावा ईडीच्या वकिलांनी कोर्टात केला. त्यानंतर कोर्टाने अतिशय महत्त्वाचा आदेश दिला आहे.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीयत. हसन मुश्रीफ यांच्यावर सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यात आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. ईडीने कोर्टात या प्रकरणी अनेक मोठे दावे केले आहेत. हसन मुश्रीफ यांनी लोकवर्गणीच्या नावातून कारखान्यात कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. ईडी याप्रकरणी मुश्रीफ यांच्याविरोधात तपास करत आहे. ईडीने याप्रकरणी हसन मुश्रीफ यांची चौकशी केली आहे. त्यानंतर ईडी अधिकारी हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नावेद मुश्रीफ यांची चौकशी करणार आहे. त्यामुळे हसन मुश्रीफ यांच्यासह त्यांच्या मुलांच्याही अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
ईडीच्या वकिलांनी कोर्टात हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नावेद मुश्रीफ यांना ईडीकडून चौकशीचे समन्स बजावण्यात आले असल्याची माहिती दिली. पण नावेद चौकशीला सामोरं जात नसल्याचा दावा वकिलांनी केला. समन्स देऊनही उत्तर आलं नाही, असं ईडीच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं. अटकेच्या भीतीने पळापळ सुरु आहे, असा दावाही वकिलांनी कोर्टात केला. त्यानंतर कोर्टाने महत्त्वाचा आदेश दिला. मुश्रीफ यांच्या मुलांनी तपासात सहकार्य करावं, असा आदेश कोर्टाने दिला. त्यामुळे नावेद मुश्रीफ हे पुढच्या दोन दिवसात ईडी चौकशीला सामोरं जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, हसन मुश्रीफ यांच्या तिन्ही मुलांनी मुंबई सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केल्याची देखील माहिती समोर आली आहे.
हसन मुश्रीफ यांच्याविरोधात ईडीची छापेमारी
ईडीकडून गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने हसन मुश्रीफ यांच्याविरोधात छापेमारी करण्यात आल्याचं बघायला मिळालंय. ईडीकडून हसन मुश्रीफ यांच्याविरोधात कडक कारवाई केली जात असल्याचं निदर्शनास आलंय. ईडी अधिकाऱ्यांनी हसन मुश्रीफ यांच्या राहत्या घरापासून साखर कारखाना, तसेच त्यांच्या निकटवर्तीयांच्या कंपन्यांवरदेखील छापे टाकले आहेत. ईडीने मुश्रीफांच्या घरी छापा टाकला तेव्हा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या घराबाहेर आंदोलन केलं होतं.
ईडीच्या वकिलांकडून कोर्टात अनेक मोठे दावे
दरम्यान, ईडी अधिकाऱ्यांकडून एकीकडे चौकशी केली जात असताना हसन मुश्रीफ यांनी कोर्टाची पायरी चढली होती. त्यांनी कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर त्यांना कोर्टाकडून अटकेपासून संरक्षण देण्यात आलं होतं. ईडीकडून या प्रकरणी सातत्याने तपास सुरु आहे. ईडीच्या वकिलांकडून कोर्टात वेगवेगळे दावे देखील केले जात आहेत. त्यामुळे हे प्रकरण आता कुठपर्यंत जातं हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.