Awhad on ED Raid : माझ्या मुलीला नुसतं बोलवलं तरी, जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यानं खळबळ, ‘ती’ चूक दाखवल्याबद्दल आव्हाडांचे आभार
'टीव्ही9 मराठी'च्या वेबसाईटवर याबाबतचे वृत्त प्रकाशित करताना अनवधानाने 'मी आत्महत्या करेन' असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केल्याचा उल्लेख झाला होता.

मुंबई : “ईडीने (ED) उद्या माझ्या मुलीला नुसतं बोलावलं, तरी ती आत्महत्या करेल” असं वक्तव्य राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या मालमत्तांवर ईडीने टाच आणल्यानंतर ‘न्यूज 18 लोकमत’ या वृत्तवाहिनीशी बोलताना आव्हाडांनी हे धक्कादायक वक्तव्य केलं होतं. मात्र ‘टीव्ही9 मराठी’च्या वेबसाईटवर याबाबतचे वृत्त प्रकाशित करताना अनवधानाने ‘मी आत्महत्या करेन’ असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केल्याचा उल्लेख झाला होता.
जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले होते?
“मी काही चुका केलेल्या नाहीत, पण माहीत नाही बाबा, वरच्या टिपिंग डिपिंगमध्ये काही चुका असतील तर, मी अत्यंत स्पष्टपणाने सांगतो, कोणी बोलो ना बोलो, भीती ही माणसाला खात असते, रात्री तीन वाजता टकटक झालं, तर हार्ट अटॅक येण्याचीच शक्यता आहे. ध्यानी मनी स्वप्नीच नाही ना, कोणाच्या घरात कोण घुसेल, पण यात सर्वाधिक हाल होतात, ज्यांचा राजकारणाशी संबंधच नसतो. आज 38 वर्ष मी राजकारणात आहे. माझ्या पोरीचा काय राजकारणाशी संबंध, पण आज ती कितीतरी ठिकाणी डायरेक्टर आहे. तिला (ईडीने) उद्या नुसतं बोलावलं, तरी ती आत्महत्या करेल. ते फ्री बर्ड्स आहेत ना, त्यांना या असल्या सवयी नाहीत. मला तरी वाटतं की तिने इथे राहू नये. वातावरण इतकं गढूळ होत राहिलं आहे. कोरोनामध्ये मी जेव्हा होतो, तेव्हा तिची परिस्थिती मी पाहिली, तीच मला भीतीदायक वाटत होती. आता जर काही.. माझ्या बाबतीत काही घडणार नाही, याची मला खात्री आहे. पण उद्या झालंच, तर पहिला माझ्या मनात विचार येतोय, माझ्या मुलीचं काय होईल” असं जितेंद्र आव्हाड ‘न्यूज 18 लोकमत’शी बोलताना म्हणाले.
जितेंद्र आव्हाड यांचे ट्वीट काय?
@TV9Marathi नि जे मी बोललोच नाही तेमी बोललो असे गृहीत धरून बातमी केली आहे ती माझी बदनामी करणारी आहे हि बातमी मागे घ्यावी व खुलासा करावा
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 23, 2022
आम्ही आधीच नमूद केल्याप्रमाणे, आमच्याकडून अनवधानाने मुलीच्या संदर्भातलं वक्तव्य हे जितेंद्र आव्हाडांच्या संदर्भात गेलं. पण मंत्री महोदयांनी आमची चूक लक्षात आणून दिल्यानंतर संबंधित बातमी आम्ही मागे घेतली आहे. सर्व सोशल माध्यमातून ती हटवण्यात आलीय. त्यानंतर सुधारीत बातमी आम्ही पुन्हा देत आहोत. आव्हाडांनी चूक लक्षात आणून दिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतोय. चुकीचा संदर्भ गेल्यामुळे त्यांना झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करत आहोत.
संबंधित बातम्या :
पलंग-गादी पाठवतो आराम करा नि राजीनामा द्या, भाजप नेते डॉ. अनिल बोंडे यांची नवाब मलिकांवर टीका
ठाकरे सरकारमध्ये मतभेद आहेत काय?, Sanjay Raut यांनी पहिल्यांदाच दिली कबुली; नेमकं काय म्हणाले?