जितेंद्र आव्हाड यांनी थेट कायदे मांडले, अजित पवार यांना भारी पडणार?
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी कायदेशीर बाबी मांडत कुणाला पक्षात नियुक्ती करण्याचा अधिकार आहे, याबाबत सविस्तर भूमिका मांडली. विशेष म्हणजे त्यांनी अजित पवार यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्द्यांवर सडेतोड उत्तर दिलं.
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या समर्थक आमदार आणि नेत्यांसोबत आज दुपारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी शरद पवार यांचं नाव घेतलं. पण यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत खासदार सुनील तटकरे यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा केली. तसेच त्यांनी इतर नवीन नियुक्त्यादेखील जाहीर केल्या. त्यांच्या याच कृतीवर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली. अजित पवार यांच्या पत्रकार परिषदेला जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिलं.
“आताच काहीवेळापूर्वी काही जणांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पत्रकार परिषद घेतली, असं टीव्हीवर आम्ही पाहिलं. त्या पत्रकार परिषदेत एक प्रायमिनिस्ट अपॉईंट झाला, एक प्रेसिडंट अपॉईंट झाला, एक डेप्युटी प्रायमिनिस्ट झाला, असे विविध पदं वाटण्यात आले. पण त्याला कायदेशीर, संविधानिक मान्यता होती का? हा प्रश्न आहे. त्यांना तसा संविधानिक आणि कायदेशीर मान्यताच नाही”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
‘तुम्हाला नेमणुका करण्याचा अधिकार नाही’
“शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना निलंबित केलं आहे. तुम्हाला अध्यक्षांनी कायदेशीरपणे निलंबित केलं आहे. त्यामुळे तुम्हाला नेमणुका करण्याचा अधिकार नाही”, असं आव्हाड म्हणाले.
“शरद पवार हेच अध्यक्ष आहेत, असं ते म्हणत आहेत. तुम्ही शरद पवार यांना अध्यक्ष मानता तर त्यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर केलेली कारवाई मान्य करणार आहेत की नाही? जयंत पाटील यांची नेमणूक पक्षाच्या संविधानानुसार केलेली आहे”, असं जयंत पाटील म्हणाले.
‘व्हीपची नियुक्तीचा अधिकार राजकीय पक्षाला’
“व्हीपची नियुक्ती हे फक्त राजकीय पक्ष करु शकतो, असं सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्ये म्हटलं आहे. विधीमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष वेगळे आहेत. त्यामुळे व्हीप लागू करण्याचा अधिकार हा राजकीय पक्षाला असतो. 40 निवडून आलेल्या आमदारांचा पक्ष होत नाही, असं सुप्रीम कोर्टाच्या शिवसेनेच्या निकालावर स्पष्ट झालं आहे. तसेच त्यांनी अध्यक्षांच्या निर्णयावर आक्षेप घेत सांगितलं की, तुम्ही एकनाथ शिंदे यांची केलेली नेमणूक ही अवैध आहे. हे आम्ही म्हणत नाहीत. तर सुप्रीम कोर्टाने आपल्या जजमेंटमध्ये म्हटलं आहे”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
‘दुसऱ्या पक्षात मर्ज होण्याशिवाय पर्याय नाही’
“विधानसभेतला एक गट बाहेर जातो आणि पक्ष असल्याचा दावा करतो तसा अधिकारच त्या गटाला नाही. आता या गटाला फक्त मर्ज होण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही”, असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला. “तुम्ही ज्या पक्षाच्या नावाने एबी फॉर्म भरला आहे, त्या पक्षाला तुमचा आमचा काही संबंध नाही, असं म्हणाल तर तसं मान्य करता येणार नाही. तुमची संख्या कितीही असो, तुम्हाला पक्ष म्हणून मान्यता देण्यात येणार नाही”, असं आव्हाड म्हणाले.
“40 आमदार आहेत. त्या 40 आमदारांच्या जीवावर तुम्ही पक्ष ठरवू शकत नाहीत. कार्यकर्ते हे खरे पक्षाची ताकद आहेत. पक्ष संविधानाने चालतं. निवडणूक आयोगाने मान्यता दिलेलं पक्षाचं संविधान हे शरद पवार यांच्याकडे आहे”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.