राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची मोठी अडचण, व्हीप VS नोटीस, कुणाचं ऐकायचं?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांपुढे मोठा प्रश्न निर्माण झालाय. शरद पवार आणि अजित पवार दोघांनी उद्या बैठक बोलावली आहे. विशेष म्हणजे दोन्ही गटाकडून आमदारांनी हजर राहावं यासाठी दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामुळे आमदारांसाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चांगल्याच अडचणीत सापडले आहेत. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा वेगळा गट पडलाय. तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा वेगळा गट पडलाय. अजित पवार यांचे किती समर्थक आमदार आहेत याबाबतचा अधिकृत आकडा समोर आलेला नाही. दोन्ही गटाच्या प्रमुखांकडून बैठक आयोजित करण्यात आली आहे. शरद पवार यांनी उद्या वाय बी चव्हाण सेंटर येथे बैठक बोलावली आहे. तर अजित पवार यांची त्यांच्या नव्या पक्ष कार्यालयात आमदारांची बैठक बोलावली आहे. राष्ट्रवादीचे आमदार कोणत्या बैठकीला जातात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
खरंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच आमदार आता अडचणीत सापडले आहेत. कारण दोन्ही बाजूने त्यांच्यावर मोठा दबाव निर्माण झाला आहे. अजित पवार गटाचे प्रतोद अनिल पाटील यांनी व्हीप जारी केला आहे. या व्हीपमध्ये त्यांनी अजित पवार यांनी उद्या बोलावलेल्या बैठकीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. हा व्हीप मानणं राष्ट्रवादीच्या आमदारांसाठी आवश्यक असणार आहे. कारण प्रतोद यांचा व्हीप मानला नाही तर त्यांच्याविरोधात अपात्रतेची कारवाई होण्याची शक्यता असते.
आमदारांना जयंत पाटील यांची नोटीस
दुसरीकडे राष्ट्रवादीच्या आमदारांना कोंडीत पकडणारी आणखी एक नोटीस आली आहे. अजित पवार आणि शरद पवार यांनी एकाच दिवशी बैठक बोलावली आहे. अजित पवार गटाकडून जसं प्रतोद अनिल पाटील यांनी बैठकीचा व्हीप जारी केला आहे, तसंच शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधीमंडळाचा गटनेता या नेत्याने नोटीस जारी करण्यात आली आहे. या नोटीसमध्ये सगळ्या आमदारांना शरद पवार यांनी बोलावलेल्या बैठकीस हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता कोणाच्या बैठकीला जायचं? हा आमदारांपुढे मोठा प्रश्न आहे. विशेष म्हणजे दोन्ही नोटीसा या आमदारांकडे पोहोचल्या आहेत.
’53 आमदार आमच्याकडे’, 9 जणांवर कारवाई
शरद पवार यांच्या गटाचे नेते जयंत पाटील यांनी सर्व 53 आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. त्यापैकी 9 जणांवर कारवाई करण्यात येत आहे. तर इतर सर्व आमदार हे आमच्यासोबत आहेत. इतर कुणी त्यांना वेगळ्या संकटात टाकू नये, असा सल्ला जयंत पाटील यांनी दिले आहेत. तर दुसरीकडे अजित पवार यांचे समर्थक नेते प्रफुल्ल पटेल यांनी आपल्याकडे 40 आमदारांचा पाठींबा असल्याचा दावा केला आहे.