दिल्लीतील अदृश्य हात, महाराष्ट्राविरोधात षडयंत्र करत आहे, सुप्रिया सुळेंची एकाच वाक्यात टीका…
राज्यपाल, सुधांशू त्रिवेदी आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावरुन खासदार सुप्रिया सळे यांनी राज्य आणि केंद्रावर निशाणा साधला आहे.
मुंबईः सध्या राज्यातील राजकारण वेगवेगळ्या वादामुळे प्रचंड चर्चेत आले आहे. कधी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करतात. तर कधी कर्नाटकचे मुख्यमंत्री सांगली जिल्ह्यातील 40 गावांवर दावा करतात. तरीही राज्यातील सत्ताधारी नेत्यांकडून कोणतीही ठोस भूमिका घेतली जात नाही, त्यांच्याबद्दल वक्तव्य केले जात नाही यावरुन आता राज्य सरकारवर विरोधी गटातील नेत्यांकडून जोरदार टीका केली जात आहे.
यावरुनच राज्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल व कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील गावांवर सांगितलेल्या दाव्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारसह केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
केंद्र सरकारवर टीका करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, दिल्लीतील अदृश्य हात महाराष्ट्राविरोधात षडयंत्र करत असल्यामुळे राज्यपाल, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी आणि बसवराज बोमई यांची महाराष्ट्राकडे तिरक्या नजरेने बघण्याची मजल जात असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राज्यपाल आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते.
तर दुसरीकडे सांगली जिल्ह्यातील 40 गावांवर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दावा केल्या आहे. या गोष्टी ठरवून केल्या जात असून महाराष्ट्राविरोधात दिल्लीत मोठे षडयंत्र होत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
या विषयावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आमचं सरकार असताना महाराष्ट्रातील गावांविषयी किंवा इतर गोष्टी बोलल्या जात नव्हत्या मात्र आताच्या काळात अशी वक्तव्य करण्याची हिम्मत कशी काय होते असा सवालही त्यांनी यावेळी केला आहे.
सुप्रिया सुळे यांनी केंद्राकडे बोट करताना म्हटले आहे की, दिल्लीत अदृश्य हात आहे आणि त्याच्याकडूनच ही असली षडयंत्र केली जात असल्याचा आरोपही त्यानी केला आहे.