Kurla Bus Accident: कुर्ला बेस्ट बस अपघाताचा आणखी एक सीसीटीव्ही, अपघाताचा थरार कॅमेऱ्यात बंद
Kurla Bus Accident New CCTV: बसचालक संजय मोरे याच्यावर विविध गुन्हे दाखल करुन त्याला अटक केली आहे. संजय मोरे हा बेस्टमध्ये कंत्राटी चालक आहे. तो एक डिसेंबर रोजी रुजू झाला होता. त्याला पॉवर स्टेअरींगची इलेक्ट्रीक बस चालवण्याचा कोणताही अनुभव नव्हता.
Kurla Bus Accident New CCTV: भरधाव बस मुंबईतील गजबजलेल्या कुर्ला परिसरात घुसली आणि एकामागे एक वाहने आणि पदचाऱ्यांना उडवू लागली. कुर्लात झालेल्या या अपघातात सात जणांनी जीव गमावला. ५० पेक्षा जास्त जण जखमी झाले. या अपघाताचा थरार दाखवणारा आणखी एक सीसीटीव्ही समोर आला आहे. जवळपास एका मिनिटांच्या या सीसीटीव्हीत भरधाव जाणारी बेस्टची बस वाहनांना उडवताना दिसत आहे.
काय घडली होती घटना
मुंबईतील कुर्ल्यामध्ये ९ डिसेंबर रोजी रात्री नऊच्या सुमारास संजय मोरे हा बेस्टची इलेक्ट्रीक बस चालवत होता. त्यावेळी अचानक त्याचे नियंत्रण सुटले आणि एकामागे एक वाहने तो उडवत जाऊ लागला. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला. तसेच ५० जण जखमी झाले. बसने रस्त्यातवरील २० ते २५ वाहनांचेही नुकसान केले. या अपघाताचा एक सीसीटीव्ही यापूर्वी आला होता. त्यानंतर आता नवीन सीसीटीव्ही समोर आला आहे.
काय आहे त्या सीसीटीव्ही
सीसीटीव्हीमधील फुजेटमध्ये सुरुवातीला रस्त्यावर बरीच वर्दळ दिसत आहे. त्यानंतर काही सेंकदात बेस्टची बस भरधाव वेगाने येत असताना दिसत आहे. ही बस रस्त्यावर धावत असणाऱ्या वाहनांना उडवत पुढे जात आहे. बसने रस्त्यावरील वाहनांना धडक देत पुढे गेल्यावर मोठ्या प्रमाणावर जमाव घटनास्थळी जमा झाल्याचे दिसत आहे. या अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांकडून मोठा रोष व्यक्त करण्यात आला होता.
कुर्ला बेस्ट बस अपघाताचा आणखी एक सीसीटीव्ही समोर pic.twitter.com/DFR9NXiMUV
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 12, 2024
या प्रकरणी पोलिसांनी बसचालक संजय मोरे याच्यावर विविध गुन्हे दाखल करुन त्याला अटक केली आहे. संजय मोरे हा बेस्टमध्ये कंत्राटी चालक आहे. तो एक डिसेंबर रोजी रुजू झाला होता. त्याला पॉवर स्टेअरींगची इलेक्ट्रीक बस चालवण्याचा कोणताही अनुभव नव्हता. तो जुन्या पद्धतीच्या बस चालवत होता. या बसची तपासणी आरटीओकडून करण्यात आली. त्यात बसमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड झाला नव्हता, असे स्पष्ट झाले आहे. बसचालकाने क्लट ऐवजी ॲक्सिलेटर पाय ठेवल्याचे सांगितले जात आहे.