NIA चौकशीचा फास आणखी आवळणार; सहआयुक्त मिलिंद भारंबेंकडून माहिती घेणार?
NIA ला सहआयुक्त मिलिंद भारंबे, प्रकाश जाधव आणि आणखी काही अधिकाऱ्यांकडून माहिती हवी आहे. | NIA Sachin Vaze

मुंबई: अंबानी स्फोटक प्रकरणात आता राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (NIA) चौकशीचा फास आणखी आवळला जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी मुंबई पोलीस दलातील (Mumbai Police) वरिष्ठ अधिकाऱ्यांना येत्या एक ते दोन दिवसांत चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, NIA ला सहआयुक्त मिलिंद भारंबे, प्रकाश जाधव आणि आणखी काही अधिकाऱ्यांकडून माहिती हवी आहे. त्यासाठी लवकरच या सर्व अधिकाऱ्यांना पाचारण गेले जाण्याची शक्यता आहे. (NIA may probe Mumbai police joint cp milind bharambe )
अंबानी स्फोटक प्रकरणाचा तपास सचिन वाझे यांच्यासारख्या सहायक पोलीस निरीक्षक (API) इतक्या कनिष्ठ पदावरील अधिकाऱ्याकडे का सोपवला. मुंबई पोलीस दलात सचिन वाझे यांच्यापेक्षा अनेक वरिष्ठ अधिकारी आहेत. मग हा तपास थेट सचिन वाझे यांच्याकडे का देण्यात आला, याची माहिती एनआयएला जाणून घ्यायची आहे. त्यासाठी या अधिकाऱ्यांना पाचारण केले जाण्याची शक्यता आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, सचिन वाझे यांनी चौकशीदरम्यान अद्याप कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याचे नाव घेतलेले नाही. मात्र, एनआयएने तशी वेळ आल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चौकशीसाठीही जय्यत तयारी केली आहे. आपण प्रसिद्धीझोतात येण्यासाठी आणि पोलीस दलातील पूर्वीची पत पुन्हा मिळवण्यासाठी अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवल्याचा बनाव रचल्याची माहिती सचिन वाझे यांनी एनआयएला दिली होती. मात्र, सचिन वाझे यांच्या या थिअरीवर NIAचा विश्वास नाही. त्यामुळे एनआयए याप्रकरणातील इतर शक्यता पडताळून पाहत असल्याचा अंदाज आहे.
मुंबई पोलीस दलातील ‘त्या’ बड्या अधिकाऱ्याची चौकशी होणार; परवानगीसाठी NIA ची गृहमंत्रालयाला विचारणा
मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटक ठेवण्याच्या कटात सहभाग असल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (NIA) लवकरच मुंबई पोलीस दलातील एका बड्या पोलीस अधिकाऱ्याची चौकशी केली जाणार असल्याचीही चर्चा आहे. या अधिकाऱ्याच्या चौकशीची परवानगी मिळवण्यासाठी NIA ने केंद्रीय गृहमंत्रालयाकडे विचारणा केली आहे. ही परवानगी मिळाल्यानंतर ‘एनआयए’चे प्रमुख या अधिकाऱ्याची चौकशी करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली होती. या अधिकाऱ्याचे नाव अद्याप समोर आलेले नाही. मात्र, लवकरच मुंबई पोलीस दलातील दोन आयपीएस अधिकाऱ्यांची चौकशी होण्याची दाट शक्यता आहे.
बड्या अधिकाऱ्याची चौकशी करताना दडपण येऊ नये म्हणून तीन वरिष्ठ अधिकारी मुंबईत दाखल
‘एनआयए’ने दोन दिवसांपूर्वीच या अधिकाऱ्याच्या चौकशीसाठी तयारी करायला सुरुवात केली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, NIA चे तीन वरिष्ठ अधिकारी सोमवारी दिल्लीहून मुंबईत दाखल झाले होते. अधिकारी पोलीस उपमहानिरीक्षक (DIG) दर्जाचे असल्याची माहिती मिळत आहे. सध्या एनआयएचे अधिकारी विक्रम खलाटे यांच्या नेतृत्त्वाखाली संपूर्ण तपास सुरु आहे. सचिन वाझे यांच्या अटकेनंतर अनेक महत्त्वाचे पुरावे समोर आले आहेत. चौकशीदरम्यान सचिन वाझे यांनी मुंबई पोलीस दलातील एका बड्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता NIA या अधिकाऱ्याला चौकशीसाठी पाचारण करण्याची शक्यता आहे. हा अधिकारी अत्यंत मोठ्या पदावर असल्यामुळे विक्रम खलाटे यांच्यावर चौकशी करताना दडपण येऊ शकते. त्यामुळे NIA कडून आणखी तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना मुंबईत पाठवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
संबंधित बातम्या:
मोठी बातमी: NIA चे अधिकारी सचिन वाझेंना पीपीई किट घालून चालायला लावणार
स्कॉर्पिओ गाडीवर सचिन वाझेंच्या हाताचे ठसे; NIA ने पुरावे दाखवल्यानंतर वाझेंची बोलती बंद
(NIA may probe Mumbai police joint cp milind bharambe )