‘मातोश्री’ समोरच पूल कोसळला, अपयश लपवण्यासाठी मुख्यमंत्र्यांचं ते विधान; नितेश राणेंची टीका

| Updated on: Sep 18, 2021 | 4:16 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना भावी सहकारी म्हटलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या या विधानावर भाजप आमदार नितेश राणे यांनी टीका केली आहे. (nitesh rane criticizes cm uddhav thackeray)

मातोश्री समोरच पूल कोसळला, अपयश लपवण्यासाठी मुख्यमंत्र्यांचं ते विधान; नितेश राणेंची टीका
नितेश राणे आणि उद्धव ठाकरे
Follow us on

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना भावी सहकारी म्हटलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या या विधानावर भाजप आमदार नितेश राणे यांनी टीका केली आहे. मातोश्रीच्या अंगणातच एमएमआरडीएचा पूल कोसळला आहे. त्यामुळे आपलं अपयश झाकण्यासाठीच मुख्यमंत्र्यांनी ते विधान केलं आहे, असा दावा नितेश राणे यांनी केला आहे. (nitesh rane criticizes cm uddhav thackeray)

नितेश राणे यांनी ‘टीव्ही9 मराठी’शी संवाद साधला. यावेळी त्यांनी हा दावा केला आहे. भाजप आणि शिवसेना एकत्र येण्याची कुठेही चिन्हे नाहीत. मुख्यमंत्री आणि त्यांचा पक्ष भाजपला सातत्याने त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे. आता स्वत:चं अपयश झाकण्यासाठी भावी सहकारी म्हटलं जात आहे. मातोश्रीच्या नजरेसमोरच एमएमआरडीएचा पूल कोसळला. त्याचं अपयश झाकण्याचा हा प्रयत्न आहे. या अपघातात कितीतरी मजूर जखमी झाले आहेत. सरकारच्या यंत्रणेचं हे अपयश आहे. उद्या जर मोठा अपघात झाला असता तर? असा सवाल नितेश राणे यांनी केला.

यांचं लक्ष फक्त पेंग्विनवर

मुंबईचे हे विविध प्रश्न सोडवायचे असतील तर मुंबईच्या बॅलन्स शीटवरून शिवसेनेला काढून टाकण्याची गरज आहे. कारण शिवसेनेचं लक्ष्य फक्त पैसा कमावणं आहे. स्वत:चे खिसे भरण्याच्या नादात एमएमआरडीएचा पूल कोसळतोय. यांचं लक्ष पेंग्विनचा लाड करण्यावर आहे. सर्व सामान्यांच्या आयुष्याची किंमत मुंबई आणि महाराष्ट्रात राहिली नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

आम्हालाही कौतुक करण्याची संधी द्या

यावेळी त्यांनी सामनातील अग्रलेखावरही भाष्य केलं. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरून बदललं तर आम्ही त्याचं कौतुक करू. एक घर कोंबडा निष्क्रिय मुख्यमंत्री बदला, आम्ही अख्या महाराष्ट्रत पेढे वाटू. संजय राऊत यांनी आम्हालाही कौतुक करण्याची संधी द्यावी, असा टोलाही त्यांनी लगावला. मोदींचा चेहरा नसता तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेना दोन आकड्यापर्यंतही पोहोचू शकली नसती. उद्या निवडणुकीला जाताना तुमच्याकडे मोदींचा चेहरा नसेल. तेव्हा काय होईल याची चिंता करा. या निवडणुकीत उद्धव ठाकरेंचा चेहरा चालणार नाही. आदित्य बद्दल न बोललेलंच बरं, अशी टीका त्यांनी केली.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काल औरंगाबादेत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या भूमिपूजनावेळी झालेल्या कार्यक्रमात मोठं विधान केलं होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाषणाची सुरुवातच भाजपला ऑफर देत केली. मुख्यमंत्री म्हणाले, “मंचावर उपस्थित आज-माजी आणि एकत्रित आले तर भावी सहकारी”. भाजप नेते रावसाहेब दानवे यांना उद्देशून मुख्यमंत्र्यांनी एकत्रित आले तर भावी सहकारी असा उल्लेख केला.

त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मीडियाशी संवाद साधला. आज-माजी आणि एकत्रित आले तर भावी सहकारी असं विधान तुम्ही केलं. त्यामागचं नेमकं कारण काय? त्याचा काय अर्थ लावायचा? असा सवाल त्यांना पत्रकारांनी केलं. त्यावर त्यांनी पुन्हा सूचक विधान करून चर्चेचा धुरळा उडवून दिला. अर्थ तोच होता, आजी-माजी सहकारी तिथे होते आणि उद्या कोणी एकत्र आले तर भावी होऊ शकतात. सगळे म्हणजे येणारा काळच काय ते ठरवेल, असं सूचक विधान करतानाच गमती जमतीचा भाग सोडा. माझा प्रामाणिक मत आहे, राजकारण आपल्या ठिकाणी, एका पातळीवर हवं. विकृत स्वरुप नको. हल्ली विकृत स्वरुप येत आहे. ते थांबले पाहिजे. राज्यात महाविकास आघाडी, केंद्रात भाजप सरकार. आपण या मातीतील आहोत, आपआपल्या पदांचा महाराष्ट्रासाठी काय उपयोग करता येईल, ते पाहावं यासाठी मी बोललो, अशी सारवासारव मुख्यमंत्र्यांनी केली. (nitesh rane criticizes cm uddhav thackeray)

 

संबंधित बातम्या:

रावसाहेब दानवे भाजपचे अध्यक्ष असताना सर्वकाही सुरळीत होतं; राऊतांचा चंद्रकांतदादांना अप्रत्यक्ष टोला

मिशन उत्तर प्रदेश, काँग्रेसची स्क्रिनिंग कमिटी जाहीर; वर्षा गायकवाड यांची समितीवर वर्णी

“उद्धव ठाकरे पुढचे तीन वर्षे मुख्यमंत्री राहणार असतील तर युतीसाठी आमची तयारी”

(nitesh rane criticizes cm uddhav thackeray)