मुंबई: आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आधीच सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी एकमेकांचा बाप काढल्याने अधिवेशनाचं वातावरण तापलेलं असतानाच आज विधानभवन परिसरात अजबच प्रकार घडलाय. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे विधानसभेत प्रवेश करत असताना विधीमंडळाच्या पायरीवर आंदोलन करत असलेल्या भाजप आमदार नितेश राणेंनी आदित्य यांना पाहून म्याऊ… म्याऊच्या घोषणा दिल्या. नितेश राणे या घोषणा देत असताना भाजपचे नेते मात्र हसत होते.
आज दुसऱ्या दिवशीही विरोधकांनी विधान भवनाच्या पायरीवर बसून जोरदार घोषणाबाजी केली. भाजप आमदार नितेश राणेंसह भाजपचे इतर आमदार पायरीवर बसून विविध मुद्द्यांवरून सरकारविरोधात घोषणाबाजी करत होते. शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापले जात आहे. परीक्षा घोटाळा आदी मुद्द्यांवरून विरोधक विधानभवनाच्या पायरीवर घोषणा देत होते. काय म्हणाले दादा, ठाकरे सरकार शोधून आणा… अशा घोषणा विरोधक देत होते. त्याचवेळी आदित्य ठाकरे हे मंत्री सुनील केदार यांच्यासह विधानसभेत जायला निघाले. त्यावेळी नितेश राणे यांनी म्याऊ… म्याऊ… म्याऊ… म्याऊ… अशा जोरजोरात घोषणा द्यायला सुरुवात केली. नितेश राणे वारंवार या घोषणा देऊन स्वत:ही हसत होते. त्यांच्या घोषणांवर भाजपचे नेतेही हसत होते.
आदित्य ठाकरे यांना धमकी आली आहे. त्यावरूनही नितेश राणे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. धमकी देण्यासारखं आदित्य ठाकरे काय करतात? त्यांना कोणत्या आवाजात धमक्या आल्या. त्यांनी रात्री 7 आणि 8 नंतरच्या बैठका बंद कराव्यात म्हणजे त्यांना धमक्या येणार नाहीत, अशी टीका नितेश राणे यांनी यावेळी दिली.
दरम्यान, आरोपीने सर्वप्रमथ 8 डिसेंबर रोजी आदित्य ठाकरे यांना व्हॉट्सअॅपवर पहिला मॅसेज पाठवला होता. या मॅसेजवर ठाकरे यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले होते. अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूला आदित्य ठाकरे हेच जबाबदार असल्याचा आरोप आरोपीने आपल्या मॅसेजमध्ये केला होता. मात्र आदित्य ठाकरे यांनी या मॅसेजला रिप्लाय दिला नाही. त्यानंतर आरोपीने त्यांना दूरध्वनीवरून तिनदा कॉल केले. आदित्य यांनी ते कॉल स्वीकारले नाही. कॉल स्वीकारले नसल्याने संतापलेल्या आरोपीने त्यांना थेट जीवे मारण्याची धमकी दिली होती, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
संबंधित बातम्या:
माझा बाप काढून आव्हाडांना काय मिळणार?; चंद्रकांत पाटलांचा पलटवार