काँग्रेसवाल्यांनो अमोल किर्तीकरांना मतदान कशाला करता? खोचक सवाल करत प्रकाश आंबेडकरांनी केला मोठा गौप्यस्फोट
Prakash Ambedkar on Amol Kirtikar : मुंबई-उत्तर-पश्चिममध्ये उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटात चुरशीची लढत आहे. या ठिकाणी महाविकास आघाडीने जोर लावला आहे. पण अँड. प्रकाश आंबेडकर यांनी एक खळबळजनक दावा केला आहे...
मुंबईचा गड काबीज करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यात पुन्हा डेरेदाखल आहेत. रोड शोज, सभांच्या माध्यमातून त्यांनी प्रचाराचा धुराळा उडवला आहे. मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघात चुरशीचा सामना आहे. उद्धव ठाकरे गटाचे अमोल किर्तीकर तर दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे यांचा उमेदवार शड्डू ठोकून आहे. काँग्रेससह इतर पक्षांनी ठाकरे गटाची प्रचाराची धुरा पेलली आहे. या मतदारसंघाविषयी वंचितचे नेते अँड. प्रकाश आंबेडकर यांच्या एका दाव्याने खळबळ उडवली आहे. त्यांचे विधान एकदम चर्चेत आले आहे.
ते तर भाजपमध्ये जाणार
मुंबई उत्तर पश्चिममध्ये एका बाजूला एकनाथ शिंदे यांचा उमेदवार आहे आणि दुसऱ्या बाजूला अमोल किर्तीकर उध्दव ठाकरेंचे उमेदवार आहेत. एक भाजपासोबत आहे पण, निवडणूक झाली तर दुसरा सुद्धा भाजपसोबत शंभर टक्के जाणार आहे. मग काँग्रेसवाल्यांनो त्यांना मतदान का करत आहात ? असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी गोरेगाव येथील सभेत केला. ते वंचितचे उमेदवार परमेश्वर रणशुर यांच्या प्रचारसभेत बोलत होते.
किर्तीकरांवर जोरदार टीका
लोकसभा निवडणुकीमधील तमाशा आपण बघत आहोत. बाप एका पक्षात तर पोरगा दुसऱ्या पक्षात आहे. सत्ता आपल्या कुटुंबातून जाता कामा नये अशी परिस्थिती आहे, असा हल्लाबोल आंबेडकरांनी किर्तीकरांवर केला आहे. शिवसेना(ठाकरे) यांची महाविकास आघाडीसोबत युती झाली आहे असे सगळ्या प्रचार सभेत सांगितले जाते, पण मुंबईच्या कोणत्याही सभेत राष्ट्रवादी (शरद पवार) यांचा कार्यकर्ता दिसत नाही आणि काँग्रेसचे कार्यकर्ते पण दिसत नाहीत. कदाचित मुंबईमध्ये तमाशा होणार आहे आणि या पक्षाचे तीनही नेते या तमाशात सहभागी असतील, असा टोला त्यांनी लगावला.
कमी मतदानाचा भाजपला फटका
- २०१४ आणि २०१९ मध्ये भाजप ७० ते ७२ टक्क्यांवर निवडणुका घेऊन गेले होते. ते आता ५० आणि ६० टक्क्यांवर आले आहे. मतदान कमी झाले आहे याचा फटका भाजपला बसणार आहे. आता ते ४०० पार नव्हे २५० पर्यंत आलेले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
- खासगीकरणाच्या माध्यमातून इथल्या मागासवर्गीयांच्या आणि वंचितांच्या नोकऱ्या घालवल्या जात आहेत. खासगीकरण कशासाठी आहे ? मालमत्ता लोकांची आहे आणि ती लोकांचीच राहिली पाहिजे, हे लक्षात घ्या असे त्यांनी सांगितले.
- अँड. प्रकाश आंबेडकर यांच्या या वक्तव्याने वादाला तोंड फुटले आहे. महाविकास आघाडीतील नेते या वक्तव्यावर काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आंबेडकर यांचा दावा किर्तीकर कसे खोडतात हे पाहणं महत्वाचे आहे.