भाजप सरकारकडून 80 वर्ष जुने मंदिर पाडण्यासाठी नोटीस, कुठे आहे तुमचे हिंदुत्व…उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारला सवाल
शिवसेनेच्या आमच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे भेटीची वेळ मागितली होती. परंतु ती नाकारली गेली. त्यामुळे मी खासदारांना सांगितले पंतप्रधानांना पत्र द्या. त्यांच्या मागे खूप व्याप आहे. त्यांना खूप फिरायचे आहे. त्यांच्या लक्षात बांगलादेशातील अत्याचार आले नसतील, असा टोला उद्धव ठाकरे यांनी मोदी यांना लगावला.
शिवसेना उबाठा पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्यावरुन केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला घेरले. बांगलादेशातील हिंदूंवर अत्याचार होत आहे. हल्ले होत आहे. त्यासंदर्भात मोदी सरकार काय पावले उचलत आहे? यासाठी आमच्या खासदारांनी त्यांच्या भेटीची वेळ मागितली. परंतु ती मिळाली नाही. दुसरीकडे मुंबईतील दादर रेल्वे स्थानकाबाहेर ८० वर्षांपासून जुने हनुमानाचे मंदिर आहे. रेल्वेतील हमालांनी बांधलेले हे हनुमानाचे मंदिर आहे. त्याला पाडण्यासाठी रेल्वेने नोटीस पाठवली आहे. मग कुठे आहे तुमचे हिंदुत्व? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारला केला आहे.
बांगलादेशातील अत्याचार थांबण्याची धमक दाखवा
उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वावरुन भाजपला घेरताना म्हटले, तुमच्या हिंदुत्वाची व्याख्या नेमकी काय आहे. तुमचे हिंदुत्व फक्त निवडणुकीसाठी आहे का? हिंदुत्व केवळ हिंदुंच्या मतासाठी आहे का? तुम्हाला हिंदूंची मते हवी. त्यासाठी त्यांना भयभीत करत आहात. बटेंगे ते कटेंगे अशा घोषणा देत आहात. परंतु ज्या ठिकाणी काहीच नाही, त्या ठिकाणी या घोषणा दिल्या जात आहेत. बांगलादेशातील अत्याचार थांबण्याची धमक दाखवा, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
मोदींना लगावला टोला
शिवसेनेच्या आमच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे भेटीची वेळ मागितली होती. परंतु ती नाकारली गेली. त्यामुळे मी खासदारांना सांगितले पंतप्रधानांना पत्र द्या. त्यांच्या मागे खूप व्याप आहे. त्यांना खूप फिरायचे आहे. त्यांच्या लक्षात बांगलादेशातील अत्याचार आले नसतील, असा टोला उद्धव ठाकरे यांनी मोदी यांना लगावला.
उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारला सवाल विचारला. ते म्हणाले, बांगला देशात हिंदूवर होणाऱ्या अत्याचाराबाबत आपली भूमिका काय आहे. हे सरकारने संसदेत सांगितले पाहिजे. बांगला देशात इस्कॉनचे मंदिर जाळले. त्याचा मला संताप आला. बांगलादेशात हिंदू सुरक्षित नाही. माझ्या देशात हिंदूंची मंदिरे पाडली जातात. ही मंदिर त्यांच्यासाठी महत्त्वाचे नाही का? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.