आता मोटरमनवर सीसीटीव्हीची नजर; लोकलमध्ये बसवणार कॅमेरे
आता लोकलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मोटरमनच्या कॅबमध्ये सीसीटीव्ही कॅमरा बसवण्यात येणार आहे. यामुळे मानवी चुकीमुळे होणाऱ्या अपघाताला आळा बसणार आहे.
मुंबई : रेल्वे बोर्डाकडून लोकलबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. इथून पुढे आता मोटरमनच्या (Motorman) कॅबमध्ये सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरा बसवण्यात येणार आहे. कॅबच्या आतून आणि बाहेरून अशा दोनही बाजूनं सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे लोकल चालवताना वेग मर्यादेचे उल्लंघन करणे, सिग्नल तोडणे अशा प्रकाराला आळा बसणार आहे. अनेकदा वेगाच्या मर्यादेवर नियंत्रण न ठेवल्याने किंवा सिग्नल तोडल्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. अशा घटना टाळल्या जाव्यात यासाठी आता मोटरमनच्या कॅबमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहोत. मोटरमनच्या कॅबमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी अंदाजे दोन कोटींचा खर्च अपेक्षित आहे. ही प्रणाली सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर पश्चिम आणि मध्य रेल्वेवरील (Central Railway) काही लोकलमध्ये राबवण्यात येणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने सर्वच लोकलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.
दिवसभरात तीन हजार फेऱ्या
मध्य व पश्चिम रेल्वे मार्गावर दिवसभरात लोकलच्या तीन हजारांपेक्षा अधिक फेऱ्या होतात. लोकलचे वेळापत्रक हाताळण्यासाठी रेल्वेकडे स्वतंत्र रेल्वे व्यवस्थापन यंत्रणा आहे. परंतु अनेकदा मोटरमनकडून वेगावर नियंत्रण राखले जात नाही. सिग्नलचे उल्लंघन केले जाते. त्यामुळे अपघात घडण्याची शक्यता असते. मात्र जर मोटरमनच्या कॅबमध्ये सीसीटीव्ही कॅमरा बसवण्यात आल्यास त्यावर नियंत्रण ठेवणे अधिक सोपे होणार आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर असल्याने अशा घटनांना आळा बसू शकतो. अपघात टाळण्याच्या दृष्टीने रेल्वेचे हे महत्त्वपूर्ण पाऊल मानण्यात येत आहे.
अपघातांना बसणार आळा
अनेकदा मोटरमनच्या चुकीमुळे अपघात होतात. त्यामध्ये वेगावर योग्य नियंत्रण न राखणे, सिग्नल तोडणे, एखाद्या स्थानकात थांबा विसरणे, वेग मर्यादेचे उल्लंघन करणे अशा विविध बाबींचा समावेश होतो. दरम्यान जर मोटरमनच्या कॅबमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आल्यास त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर मोटरमनवर असणार आहे. कॅबच्या आतून आणि बाहेरून अशा दोनही बाजूने कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. मोटरमनची काही चूक झाल्यास ते कॅमेऱ्यामध्ये टीपले जाईल. सीसीटीव्ही कॅमेरे लावल्याने मोटरमन देखील अधिक सर्तक होतील. सर्व नियमांचे पालन करण्यात येईल. नियमांचे पालन केल्यास अपघात घडणार नाहीत. यासाठी हे कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. ही प्रणाली सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर पश्चिम आणि मध्य रेल्वेवरील काही लोकलमध्ये राबवण्यात येणार आहे. यासाठी दोन कोटींचा खर्च अपेक्षित आहे.