पनवेल शहरात कोरोनाचा कहर, दिवसभरात 24 नवे रुग्ण, बाधितांचा आकडा 180 वर
नवी मुंबईतील पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचा प्रादुर्भाव (Panvel Corona Update) वाढत चालला आहे. पनवेलमध्ये आज (11 मे ) तब्बल 24 नवे रुग्ण आढळले आहेत.

मुंबई : नवी मुंबईतील पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचा प्रादुर्भाव (Panvel Corona Update) वाढत चालला आहे. पनवेलमध्ये आज (11 मे ) तब्बल 24 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे पनवेलमधील कोरोनाबाधितांचा आकडा 180 वर पोहोचला आहे. दरम्यान, पनवेलमध्ये आज 9 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. या रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे (Panvel Corona Update).
पनवेल महापालिका हद्दीत आढळलेल्या रुग्णांमध्ये खांदा कॉलनीतील 8, कामोठ्यातील 6, रोडपाली वसाहतीतील 4 तर खारघर आणि कळंबोलीतील प्रत्येकी 3 रुग्णांचा समावेश आहे. पनवेलमध्ये आतापर्यंत 180 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी 78 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर 7 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पनवेलमध्ये सध्या 95 रुग्णांवर उपचार सुरु आहे.
पनवेल महापालिका हद्दीतील 9 रुग्णांना डिस्चार्ज
पनवेल महापालिका हद्दीतील 9 रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून त्यांचा रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे. डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांमध्ये कामोठ्यातील 5, नवीन पनवेलमधील 2 तर खारघरमधील 2 रुग्णांचा समावेश आहे.
खांदा कॉलनीतील 2 कुटुंबांतील 8 जणांना कोरोनाची लागण
पनवेलच्या खांदा कॉलनी परिसरात आज एकाच कुटुंबातील 4 नवे रुग्ण आढळले आहेत. या कुटुंबातील एका सदस्याला याआधीच कोरोनाची लागण झाली होती. याशिवाय या परिसराती आणखी एका कुटुंबातील 4 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
कामोठ्यात 6 नवे रुग्ण
कामोठ्यात आज 45 वर्षीय महिलेला आणि तिच्या 11 वर्षीय मुलीला कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाबाधित महिला ही मुंबई महापालिकेत लिपिक म्हणून कार्यरत असून कामाच्या ठिकाणी तिला कोरोनाचा संसर्ग झाला. या महिलेच्या संपर्कातून आपल्या मुलीला कोरोनाची लागण झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
याशिवाय कोमोठ्यात एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. या कुटुंबातील कुटुंबप्रमुख आधीपासूनच कोरोना पॉझिटिव्ह असून त्यांच्यापासूनच या दोघांना संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे. त्याचबरोबर कामोठ्यात वास्तव्यास असलेल्या मुंबईतील पोलीस दलात कार्यरत दोन पोलीस कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.
रोडपाली वसाहतीतील एकाच कुटुंबातील चौघांना कोरानाची लागण
रोडपाली वसाहतीत एकाच कुटुंबातील 4 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे.
कळंबोलीत 3 नवे कोरोनाबाधित रुग्ण
कळंबोलीत वास्तवास असलेल्या एकाच कुटुंबातील 2 व्यक्तींना आणि त्यांच्या शेजारी राहणाऱ्या महिलेलाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. या कुटुंबातील कुटुंबप्रमुख मुंबई येथे बेस्ट कंडक्टर असून ते याआधीच कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यांच्यामार्फतच कुटुंबातील इतर दोन सदस्यांना कोरोनाची लागण झाली.
खारघरमध्ये 3 नवे कोरोनाबाधित रुग्ण
खारघरमध्ये वास्तव्यास असलेल्या व्यक्तीचा रिपोर्ट आज कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. ही व्यक्ती गोवंडीतील डेपोमध्ये बेस्ट कंडक्टर म्हणून कार्यरत असून कामाच्या ठिकाणीच त्यांना संसर्ग झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. याशिवाय खारघरमधील एकाच कुटुंबातील 2 व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. या कुटुंबातील कुटुंबप्रमुख चेंबूर येथे पीएसआय म्हणून कार्यरत असून ते याआधीच कोरोनाबाधित आहेत. त्यांच्यापासूनच या दोघांना संसर्ग झाला.
संबंधित बातम्या :
दिल्लीत अडकलेले UPSC चे 1600 विद्यार्थी महाराष्ट्रात परतणार, विशेष रेल्वेची व्यवस्था
अत्यावश्यक सेवेसाठी मुंबईत लोकल सेवा सुरु करा, मुख्यमंत्र्यांची मोदींकडे मागणी