प्रवाशांनो आकडेवारी आली, इतक्या टॅक्सी चार्टमध्ये पाहूनच भाडे घेतात
प्रवाशांच्या सोयीसाठी नव्या भाड्याप्रमाणे क्यूआर कोडयुक्त भाड्याचा तक्ता रिक्षा-टॅक्सी चालकांना पुरविण्यात आला आहे. हा क्यूआर कोड मोबाईल फोनने स्कॅन करताच परिवहन विभागाची वेबसाईट उघडून नवे भाडेदर तपासून पाहता येणार आहे. परंतू अनेक टॅक्सीचालकांकडे हा तक्ता नसून ते मनमर्जीप्रमाणे भाडे आकारत आहेत.
मुंबई : रिक्षा-टॅक्सीची एकऑक्टोबरपासून भाडेवाढ करण्यात आली आहे. रिक्षाचे किमान भाडे 21 रूपयांवरून 23 रूपये तर टॅक्सीचे किमान भाडे 25 रूपयांवरून 28 रूपये करण्यात आले आहे. या नव्या भाडे दरानुसार टॅक्सी आणि रिक्षांच्या मीटरमध्ये बदल करण्यासाठी येत्या 15 जानेवारीपर्यंत वेळ देण्यात आली आहे. मात्र आरटीओची आकडेवारी मात्र भलतेच सांगत आहे.
मुंबईत एकूण 43,031 टॅक्सी असून त्यापैकी आतापर्यत केवळ 16,436 टॅक्सींच्या मीटरमध्ये नवीन भाड्यानूसार बदल केले आहेत. त्यामुळे 26,595 टॅक्सीच्या मीटरचे रिकॅलीब्रेशन झाले नसल्याचे उघडकीस आले आहे. यात उपनगरातील टॅक्सींच्या मीटर कॅलीब्रेशनची स्थिती समाेर आलेली नाही.
मुंबईतील 2 लाख 84 हजार 870 रिक्षांपैकी 1 लाख 37 हजार 139 रिक्षांच्या मीटरचे कॅलीब्रेशन पुर्ण झाले आहे. त्यामुळे अजूनही 1 लाख 47 हजार 731 रिक्षांच्या मीटरमध्ये नवीन भाड्याप्रमाणे बदल करण्याचे काम शिल्लक आहे. काळी-पिवळी टॅक्सी चालक आणि रिक्षांना त्यांच्या मीटरमध्ये नवीन भाड्याप्रमाणे बदल करून घेण्यास आधी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानंतर ही मुदत आता 15 जानेवारी 2023 पर्यंत वाढवून देण्यात आली आहे.
15 जानेवारीच्या आत सर्व रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी मीटरमध्ये नवीन भाड्यानूसार बदल न केल्यास वाहतूक प्राधिकरण अशा चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यास सुरूवात करणार आहे. याबाबत मुंबई टॅक्सीमेन्स युनियनचे नेते ए.एल. क्वॉड्रोस यांना विचारले असता त्यांनी सांगितले की आरटीओची आकडेवारी कागदावरील आहे, प्रत्यक्षात ऑन रोड 25 हजार टॅक्सीही धावत नसल्याचे चित्र आहे. कोरोनाकाळात गावी गेलेले अर्ध्याहून अधिक टॅक्सीचालक परराज्यातून परतलेलेच नाहीत. त्यामुळे येत्या 15 जानेवारीच्या मुदतीच्या आत सर्व टॅक्सींचे नव्या भाड्यानूसार मीटर कॅलीब्रेशनचे काम पूर्ण होईल असेही क्वॉड्रोस यांनी स्पष्ठ केले आहे.
ऑटो रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ 1 ऑक्टोबरपासून लागू झाली असून रिक्षाचे दर पहिल्या 1.5 किमीसाठी 21 रूपयावरुन 23 रू. तर नंतर प्रत्येक किमीसाठी 14.20 रू.वरून 15.33 रू. तर टॅक्सीचे दर पहिल्या 1.5 किमीसाठी 25 रू.वरून 28 रू. आणि नंतर प्रत्येक किमीसाठी 16.93 रू.वरून 18.66 रू.केला आहे. व कुल कॅबसाठी पहिल्या 1.5 किमीसाठी 33 रू.वरून 40 रू. असा केला असून त्यापुढीस प्रत्येक किमीसाठी 22.26 रू.वरून 26.71 रू. करण्यात आला आहे.