Sanjay Raut : अगोदर हिंदूवर हल्ले करायचे नंतर दंगली भडकावायच्या, संजय राऊतांनी सांगितला नवीन पॅटर्न, काय केला आरोप?
Sanjay Raut Allegation : नागपूरमध्ये काल उसळलेल्या हिंसाचारावरून एकच गोंधळ उडाला. ट्रॉलीभर निघतील इतके दगड पोलिसांनी जमा केले. या हिंसाचारावर खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली.

औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर जाळल्यानंतर नागपूरमध्ये संध्याकाळी मोठा हिंसाचार उसळला. महाल भागातील या वणव्याचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटत आहेत. या हिंसाचारावर विरोधकांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या सर्व प्रकारावर तोफ डागली आहे. त्यांनी हा नवीन दंगल पॅटर्न असल्याचा घणाघात केला. काय म्हणाले राऊत?
हा तर नवीन दंगल पॅटर्न?
हिंदूंना भडकवण्यासाठी अशा प्रकारे दंगली घडवतात. आधी हिंदूंवर हल्ले केले जातात. हा एक नवीन पॅटर्न तयार केला आहे, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला. कुणाची हिंमत आहे इथे अशा प्रकारे काम करण्याची नागपुरात किंवा मुंबईत. मला वाटत नाही. हा एक दंगल पॅटर्न देशात नवीन निर्माण झाला आहे, असा घणाघात राऊतांनी घातला.




हा सर्व निवडणुकीसाठी प्रयोग
आधी हिंदूंच्या डोक्यात भय निर्माण करायचं. त्यांच्यावर हल्ले घडवायचे आणि मग त्यांना दंगलीसाठी प्रवृत्त करायचं आणि मग राज्यात देशात दंगली पेटवून २०२९च्या निवडणुकीला सामोरे जायचं हा निवडणुकीतला दंगल पॅटर्न सुरू झाला आहे, असे मत राऊतांनी व्यक्त केले आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका
महिमामंडन औरंगजेबाचं होणार नाही या फडणवीस यांच्या विधानाचं आम्ही स्वागत करत आहोत. पण हे सांगण्यासाठी आम्हाला महामोहपाध्याय देवेंद्र फडणवीस यांची गरज नाही, असा चिमटा त्यांनी काढला. महाराष्ट्रात महिमामंडन शिवरायांचंच होणार. ते होतच राहणार. जगभरात होणार आहे, त्यांनी सांगितले.
औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण कोणीच करत नाही. तुमचेच लोक करत आहेत. तेच कुदळ फावडी घेऊन फिरत आहेत. आतापर्यंत असं झालं नव्हतं. तो शौर्याचा इतिहास मान्य केल्यावर तुमचे लोकं कुदळ फावडे घेऊन फिरत असेल तर ही संघटीत गुन्हेगारी आहे. त्या सगळ्यांना मकोका लावा, अशी मागणी राऊतांनी केली आहे. हे औरंगजेबाचे प्रकरण काढलंय ते सरकारमधील मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे दाबण्यासाठी सुरू आहे. सरकार रोज बदनाम होत आहे. अनेक प्रश्न या राज्यात निर्माण झाले आहे. त्यामुळे औरंगजेबासारख्या विषयांना उत्तेजन दिलं जात आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला.
जयकुमार रावल यांच्यावर आरोप
जयकुमार रावल यांनी रावल कोऑपरेटिव्ह बँक आधीची दोंडाईचा कोऑपरेटिव्ह बँक यातून १८० ते १९० कोटी रुपये आपल्या नातेवाईकांना बेकायदेशीरपणे दिले. बँकेचं कार्यक्षेत्र महाराष्ट्र असताना गुजरातमधील नातेवाईकांना पैसे दिले आणि बँक बंद पाडली. बेकायदेशीरपणे गुन्हेगारी पद्धतीने पैसे बाहेर काढले. हा मनी लॉन्ड्रींगचा प्रकार आहे, असा आरोप राऊतांनी केला.