मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा सन्मान राखत तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला. हे कायदे मागे घेण्याची घोषणा करतानाच आता नवी सुरुवात करूया असं मोदी म्हणाले. तर, भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मात्र आजचा दिवस काळा असल्याचं म्हटलं आहे. ही प्रतिक्रिया देताना दरेकर यांनी शेतकरी नेते शरद जोशी यांच्या विचारांचा दाखलाही दिला आहे.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी टीव्ही9 मराठीशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आजचा दिवस हा शेतकऱ्यांसाठी काळा दिवस आहे. शेतकऱ्यांचे नेते म्हणून शरद जोशींनी आपलं आयुष्य पणाला लावलं होतं. शेतकऱ्यांच्या पायातल्या शृंखला दलालांच्या बेड्या आपण काढा. शेतकऱ्यांना बाजारात मुक्त व्यवहार करू द्या. त्यांच्या बांधावर माल खरेदी करू द्या. दलाल, ट्रान्स्पोर्ट, कमिशन हे सर्व जाईल तरच शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होईल, असं शरद जोशी म्हणायचे, असं दरेकर यांनी म्हटलं आहे.
जेव्हा केंद्र सरकारने तीन कृषी कायदे केले तेव्हा मी म्हणालो होतो की, शरद जोशींच्या आतम्याला शांती लाभली असेल. आज शेतकऱ्यांच्या हिताचे कृषी कायदे मागे घ्यावे लागले आहेत. मला वाटतं पुन्हा शरद जोशींचा आत्मा अस्वस्थ झाला असेल, असं त्यांनी सांगितलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांच्या आंदोलनातील हवा निघून काढून घेतली आहे. विषय प्रतिष्ठेचा न करता मोदींनी शेतकऱ्यांच्या मनाप्रमाणेच केलं आहे. त्यांनी स्वत:च्या मनासारखं केलं नाही. हा कायदा देशातील 80 टक्के शेतकऱ्यांसाठी होता. ज्या शेतकऱ्यांकडे 5 एकरापेक्षा कमी शेती आहे. त्यांच्या आर्थिक विकासासाठी हे कायदे आणले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर त्यांचा सात वर्षातील इतिहास पाहा. यापूर्वी तत्कालीन काँग्रेस सरकारने 2009ला 69 हजार कोटीचं पॅकेज दिलं. त्याचं तुणतुणं आपण अजून वाजवतो.पण पंतप्रधान मोदी हे पीएम किसान योजने अंतर्गत दरवर्षी 80 हजार कोटी शेतकऱ्यांच्या अकाऊंटमध्ये देत आहे. शेतकऱ्यांसाठी त्यांनी हे ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत, असं त्यांनी सांगितलं.
ज्यांच्याासठी करायचं आहे. त्यांनाच हे समजलं नसेल तर आपण काहीच करू शकत नाही. शेवटी हा देश कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा सन्मान करणं आपलं कर्तव्य आहे. त्याचाच भाग म्हणून शेतकऱ्यांचा सन्मान करत हे कायदे रद्द करण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
संबंधित बातम्या:
PM Modi Speech Highlights | मोदींच्या घोषणेनंतरही शेतकरी आंदोलन आजच संपणार नाही