मुंबई: शिवसेनेच्या बड्या नेत्यांवरच थेट हल्लाबोल करणारे शिवसेना नेते आणि माजी विरोधी पक्षनेते रामदास कदम आज विधानभवनात आले होते. मात्र, त्यांना विधानभवनात जाण्यापासून रोखण्यात आले आहे. आरटीपीसीआर चाचणी केली नसल्याने कदम यांना पोलिसांनी आत प्रवेश दिला नाही. त्यामुळे कदम प्रचंड वैतागले होते. त्यानंतर त्यांनी फोनाफोनी केल्यावर बऱ्याच वेळानंतर त्यांना आत सोडण्यात आलं. मात्र, कदम हे माजी विरोधी पक्षनेते आहेत. त्यांच्या पक्षाची राज्यात सत्ता आहे, असं असतानाही त्यांना गेटवरच अडवल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. तसेच या घटनेचे राजकीय अर्थही काढले जात होते.
रामदास कदम आज दुपारी विधानभवनात आले होते. काही कामानिमित्ताने ते विधानभवनात आल्याचं सांगितलं जातं. मात्र, त्यांना विधानभवनाच्या गेटवरच अडवण्यात आलं. आरटीपीसीआर चाचणी केली का अशी विचारणा कदम यांना करण्यात आली. कदम यांनी नाही असे उत्तर दिल्याने त्यांना आतमध्ये जाण्यास मज्जाव करण्यात आला. जोपर्यंत आरटीपीसीआर चाचणी करून येत नाही तोपर्यंत आतमध्ये प्रवेश मिळणार नसल्याचं त्यांना सांगण्यात आलं. यावेळी कदम यांनी सुरक्षा रक्षकांसोबत वादही घातला. मात्र, तरीही त्यांना आतमध्ये जाऊ दिलं गेलं नाही. त्यानंतर कदम हे बराच वेळ विधानभवनाच्या बाहेर उभे होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशीही संवाद साधला. याचवेळी त्यांनी काही ठिकाणी फोनाफोनीही केली. त्यानंतर त्यांना आत सोडण्यात आलं. कदम यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेच्या नेत्यांवर खासकरून परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर टीकास्त्र सोडलं होतं. त्यानंतर आता विधानसभेत आलेल्या कदम यांना प्रवेश नाकारण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
रामदास कदम यांनी गेल्या आठवड्यात पत्रकार परिषद घेऊन अनिल परब यांच्यावर टीका केली होती. गद्दार कोण अनिल परब की रामदास कदम हे शिवसैनिकांना कळलं पाहिजे म्हणून मी तुमच्याशी बोलत आहे. मंत्रीपद मिळाल्यानंतर परब हे शिवसेनेच्या मुळावर उतरले आहेत. दापोली आणि मंडणगड नगरपंचायतीच्या निवडणुका आहेत. योगेश कदम आमदार आहेत. त्यांनी उमेदवार पाहिले. पक्षाला कळवलं. आणि पक्षनेत्यांनी मुलाखती घेतल्या. पण त्याचा काही उपयोग झाला नाही, असं ते म्हणाले होते.
यावेळी त्यांनी परब यांच्या निवडणुकीतील सेटलमेंटवरही टीका केली होती. परब यांनी मिटिंग बोलावली या मिटिंगला राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे आणि सूर्यकांत दळवी होते. पाच वर्ष या सूर्यकांत दळवींनी संजय कदम यांच्या खांद्याला खांदा लावून माझ्या मुलाविरोधात काम केलं. त्यानंतर परब यांनी आमच्या पक्षाचे निष्ठावंत नेते उदय सामंत यांना बोलावून घेतलं. आता सामंत यांच्याकडून निष्ठा शिकावी लागते. त्यांना परब यांनी बोलावलं आणि तिकीट वाटप केलं. राष्ट्रवादीला 9 आणि शिवसेनाला 5 जागा घेतल्या. पहिले अडीच वर्ष राष्ट्रवादीला नगराध्यक्षपद देण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेची पाच वर्ष सत्ता असतानाही राष्ट्रवादीला नगराध्यक्षपद दिलं. मग परब निष्ठावंत कसे? त्यांनी संपूर्ण पक्ष राष्ट्रवादीला आंदण देण्याचं काम सुरू केलं आहे, असा दावाही त्यांनी केला होता.
अखेर ठरलं! विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक 28 डिसेंबर रोजी; नवा अध्यक्ष कोण? राजकीय वर्तुळाचं लक्ष वेधलंhttps://t.co/3Cnh1PGisy#MaharashtraAssembly | #mahavikasaghadi | #sangramthopte | #prithvirajchavan | #ashokchavan | #nitinraut | #Congress
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 24, 2021
संबंधित बातम्या:
विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून संग्राम थोपटे?; आणखी तीन बडे नेतेही चर्चेत