मराठा आरक्षणावरुन राज्यात दिवसभरात कुठे काय घडलं?
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक घडामोडी घडत आहेत. मराठा कार्यकर्ते राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन करत आहेत. मराठा आंदोलकांकडून आज काही ठिकाणी रस्ता आडवून टायर जाळल्याच्या घटनाही आज घडल्या. तसेच मनोज जरांगे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केल्याने महाराष्ट्राचं राजकारणही तापलं.
मुंबई | 1 नोव्हेंबर 2023 : मराठा आंदोलनानिमित्त आजही ठिकठिकाणी निदर्शनं झाली. मुंबईत मंत्री हसन मुश्रीफांच्या गाडीच्या काचा फोडल्या गेल्या. तर अनेक भागात रास्तारोकोचं सत्र कायम राहिलं. मराठा आंदोलनानिमित्त आजही ठिकठिकाणी निदर्शनं झाली. मुंबईत मंत्री हसन मुश्रीफांच्या गाडीच्या काचा फोडल्या गेल्या. तर अनेक भागात रास्तारोकोचं सत्र कायम राहिलं. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेनंतर आता भाजप नेते आक्रमक झाले आहेत. फडणवीसांनी काल बीडमध्ये विशिष्ट समाजाच्या लोकांना टार्गेट केलं गेल्याचं विधान केलं, त्यावर जरांगे पाटलांनी फडणवीसांना लक्ष्य केलं होतं. मात्र जरांगेंचा स्क्रिप्टरायटर कोण? असा प्रश्न आता भाजपनं उपस्थित केलाय.
जाळपोळ करणाऱ्यांवर खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल करु, या विधानानंतर जरांगे पाटलांनी फडणवीसांवर निशाणा साधला. त्यानंतर मात्र भाजप नेत्यांनी जरांगेंच्या आंदोलनालाच राजकीय पिंजऱ्यात उभं केलंय. भाजपकडून प्रवीण दरेकर, प्रसाद लाड आणि नितेश राणेंनी फडणवीसांवर केलेल्या टीकेबद्दल जरांगे पाटलांना उत्तर दिलंय. विशेष म्हणजे काल आमदार नितेश राणेंनी जरांगेंना फोन करुन त्यांची विचारपूस केली. मात्र फडणवीसांच्या टीकेनंतर जरांगेंची स्क्रिप्ट कुठून येते? असा सवालही विचारलाय.
भाजप नेत्यांचं मनोज जरांगेंना उत्तर
आमदार प्रसाद लाड आणि प्रविण दरेकरांनीही फडणवीसांवरच्या जरांगेंना उत्तर दिलं. मात्र जरांगे समर्थकांनीही भाजप नेत्यांचे आक्षेपांना चूक ठरवलंय. दरम्यान हिंसेचं समर्थन करु नये. जाळपोळ करणारे शिवरायांचे मावळे नाहीत, असं म्हणत कायदा हाती न घेण्याचं आवाहन नितेश राणेंनी केलंय. मात्र ३ महिन्यांपूर्वी जेव्हा कोल्हापुरात हिंदू-मुस्लिम दंगल झाली, तेव्हा कायदा हाती घेण्याची भाषा कोण करत होतं? असा प्रश्न विरोधकांनी केलाय.