महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंपाचे संकेत? शिंदे-फडणवीस सरकार कोसळण्याची शक्यता? प्रकाश आंबेडकर यांचा मोठा दावा
महाराष्ट्रात नवं सरकार स्थापन होऊन आता आठ महिने होत आले तरी राज्य मंत्रिमंडळाचा दुसऱ्या टप्प्यातील विस्तार झालेला नाही. या मुद्द्यावरुन वारंवार विरोधकांकडून निशाणा साधला जातो.
मुंबई : महाराष्ट्रात नवं सरकार स्थापन होऊन आता आठ महिने होत आले तरी राज्य मंत्रिमंडळाचा दुसऱ्या टप्प्यातील विस्तार झालेला नाही. या मुद्द्यावरुन वारंवार विरोधकांकडून निशाणा साधला जातो. विशेष म्हणजे महाराष्ट्रात नव्याने स्थापन झालेलं सरकार कधीही कोसळू शकतो, अशी चर्चा वारंवार राजकीय वर्तुळात रंगते. या विषयी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांना प्रश्न विचारला असता त्यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली. प्रकाश आंबेडकर यांनी आज ‘टीव्ही 9 मराठी’च्या ‘रोखठोक’ या विशेष कार्यक्रमात मुलाखत दिली. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर आपली स्पष्ट भूमिका मांडली.
“कायदेशीरपणे विचार केला तर सुप्रीम कोर्टाला स्टे देण्याचा अधिकार नाही. हा स्टे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. जो कुणी माझ्या या स्टेटमेंटवर विश्वास ठेवायला तयार नाही”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
“सभागृहात जे चालतं ते आमच्या कक्षेच्या बाहेर आहे. त्यावर आम्ही जजमेंट देऊ शकत नाही, हस्तक्षेप करु शकत नाही. म्हणून निर्णय काही करायचा असेल तो सभागृहाने निर्णय घ्यावा, असं सुप्रीम कोर्ट एका प्रकरणात म्हणालं होतं”, असं प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं.
“आसाममधील जी केस आलीय त्याबद्दल बेकायदेशीर निर्णय देण्यात आला होता”, असंही ते यावेळी म्हणाले.
“सभागृहात जे काही घडतं त्यामध्ये कोर्टाला हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही, असा निकाल सुप्रीम कोर्टाच्या एका बेंचने दिला होता. तसा निकाल जर मान्य झाला तर 16 जण अपात्र ठरतील”, अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली.
आगामी काळात महाविकास आघाडीत बिघाडी होणार?
दरम्यान, पुण्यात चिंचवडच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे नेते राहुल कलाटे (Rahul Kalate) यांनी बंडखोरी केलीय. महाविकास आघाडीत ती जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देण्याचं ठरलेलं असताना कलाटे यांनी देखील उमेदवारी अर्ज केला. याच विषयी प्रकाश आंबेडकर यांना प्रश्न विचारला असता त्यांनी सूचक वक्तव्य केलं.
“मी मागच्या निवडणुकीत तीन वेळा राहुल कलाटे यांच्या सभेला जाऊन आलोय. मागच्या निवडणुकीत मी त्यांच्या प्रचाराला जाऊन आलोय. त्यामुळे राहुल कलाटे यांच्याबद्दल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सांगितलं होतं की, कुणीतरी त्यांना स्वीकारा”, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.
“उद्धव ठाकरे यांनाच चिंचवडचा तिढा सोडवावा लागणार आहे. आम्ही शेवटपर्यंत थांबणार आहोत. आमच्याकडून काहीच गडबड होणार नाही. हा गोल्डन पिरिअड आहे. या पिरिअडमध्ये जे काही घडवता येईल ते घडवलं पाहिजे”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
“चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात बैठका होऊन जी रणनीती आखली जाणं आवश्यक होतं ते हवं तसं झालं नाही, असं मला वाटतं. त्याचा अभाव मला दिसतोय. आता त्यांचंच तिघांचं जमतं की नाही? हाच मोठा इशू मला दिसतोय”, असं मोठं विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलं.
“मी आजही सांगतो की, आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही चौघं एकत्र आलो तर 200 पेक्षा जास्त जागा निवडून येतील. असं घडू नये, पण शिवसेना आणि आम्हाला दोघांनाच लढवण्याची वेळ आली तर 150 पेक्षा कमी जागा येणार नाहीत”, असंदेखील मोठं विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलं.