अशोक चव्हाण महाराष्ट्राच्या राजकारणातून बाद?, भाजपने गेम केला?; पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा काय?
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर अशोक चव्हाण यांनी अखेर आज भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण यांचा प्रवेश पार पडला. यावेळी चव्हाण यांच्या राजकीय आणि प्रशासकीय अनुभवाचा फायदा करून घेणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
कृष्णा सोनारवाडकर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 13 फेब्रुवारी 2024 : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश करून काँग्रेसमध्ये भूकंप घडवून आणला आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली आहे. गेल्या आठवड्याभरातील काँग्रेससाठी हा दुसरा फटका आहे. दोन पिढ्यांपासून काँग्रेससोबत असलेल्या चव्हाण कुटुंबातील मातब्बर नेत्याने भाजपमध्ये प्रवेश केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. तर, काँग्रेसला आगामी काळात गळती लागण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. चव्हाण यांना भाजपकडून राज्यसभा दिली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी वेगळच विधान करून भाजपला जोरदार धक्का दिला आहे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मीडियाशी बोलताना मोठा दावा केला आहे. भाजपने आपल्याला उपमुख्यमंत्रीपद द्यावं आणि सोबत सार्वजनिक बांधकाम खातं द्यावं, अशी अशोक चव्हाण यांची इच्छा होती. पण ही त्यांची इच्छा काही पूर्ण झालेली दिसत नाही. आता राज्यसभेची जागा देऊन त्यांची बोळवण करण्यात आली आहे. चव्हाण यांना राज्यसभेची जागा देऊन एकप्रकारे महाराष्ट्राच्या राजकारणातून बाजूला करण्याचा प्रयत्न झालेला आहे, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. त्यामुळे तर्कवितर्क काढला जात आहे. भाजपने अशोक चव्हाण यांचा गेम केलाय का? अशोक चव्हाण यांना महाराष्ट्राच्या राजकारणातून बाद करण्यात आलंय का? आलंय का? असे सवालही या निमित्ताने विचारले जात आहेत.
तेच उत्तर देतील
अशोक चव्हाण यांना राज्यसभा सीट का महत्त्वाची वाटली हे उद्यापर्यंत कळेलच. थेट निवडणुकीला सामोरे जाऊ नये असं त्यांना का वाटलं? त्याची चिंता का वाटली? याचं उत्तर तेच देतील, असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
ही शोकांतिका
अमित शाह किंवा जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश व्हावा अशी अशोक चव्हाण यांची इच्छा होती. पण ते झालं नाही. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते त्यांचा पक्षप्रवेश करण्यात आला. ही शोकांतिका आहे, असा चिमटाही त्यांनी काढला.