Video : अखेर तो आलाच… मुंबईसह पालघरमध्ये पावसाला दमदार सुरुवात; पुढचे दोन दिवस पावसाचेच
अखेर मुंबईसह पालघरमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांची उकाड्यातून सुटका झाली आहे. सकाळी सकाळीच पावसाने हजेरी लावल्याने चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती.
मुंबई : आज येईल, उद्या येईल… असं सांगितलं जात असताना वारंवार हुलकावणी देणाऱ्या पावसाने अखेर मुंबईसह पालघर जिल्ह्यात दमदार हजेरी लावली आहे. कालच मुंबईसह पालघरमध्ये तुरळक सरी कोसळल्या. मात्र, आज सकाळपासून पावसाने ढगांच्या गडगडाटासह दमदार हजेरी लावली. त्यामुळे ऐन सकाळी पावसाने हजेरी लावल्याने कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली. छत्री आणि रेनकोटशिवाय कामावर निघालेल्या चाकरमान्यांना भिजतच जावे लागले. तर, पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला आहे.
मुंबईत काल पावसाने दस्तक दिली होती. हलक्या सरी कोसळल्याने काहीवेळ वातावरणात गारवा निर्माण झाला होता. पण नंतर पाऊस गेल्याने वातावरणात प्रचंड उकाडा निर्माण झाला. मात्र, आज सकाळीच मुंबईसह कांदिवली, बोरिवली, मालाड, अंधेरी, दहिसर, विलेपार्ले या उपनगरांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. सकाळीच पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. मुंबईत पावसाने हजेरी लावली असली तरी कुठेही पाणी साचलेले नाही. मात्र, सकाळी सकाळीच पावसाने हजेरी लावल्याने कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती.
मुंबईत ढगाळ वातावरण
दरम्यान, मुंबईत पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे. तसेच मुंबईत वारेही वाहत आहेत. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, बिपरजॉय वादळ हे उत्तरेकडे सरकणार आहे. त्यामुळे या वादळाचा फटका गुजरातच्या किनारपट्टीला बसणार आहे. गुजरातच्या द्वारका किनारपट्टीला हे वादळ धडकणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे किनारपट्टीचं नुकसान होऊ नये आणि नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून स्थानिक प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे.
वसई-विरारमध्ये दमदार हजेरी
मान्सूनचं महाराष्ट्रात कालच आगमन झालं आहे. रत्नागिरी, श्रीहरी कोटासह विरार-वसईत पावसाला सुरुवात झाली आहे. पुढील दोन दिवस वेगवान वाऱ्यासह पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. वसई-विरारमध्ये काल रात्री पावसाने हजेरी लावली होती. रात्री पालघर जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या होत्या. मात्र, आज सकाळ पासूनच वसई-विरारमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे.
ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटसह वसई-विरारमध्ये पाऊस सुरू झाला आहे. मान्सूनच्या पावसाची सुरवात झाल्याने नागरिकांत समाधानाचे वातावरण आहे. काल दिवसभर कडाक्याचे ऊन आणि जोराचा वारा सुरू होता. आज पावसाने दमदार हजेरी लावली. सकाळी कामावर जाण्याच्या वेळेत पाऊस सुरू झाल्याने चाकरमाण्यांची तारांबळ उडाली.
यलो अॅलर्ट जारी
काल राज्यात दक्षिण कोकणात आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला आहे. राज्यात पुढच्या 4 ते 5 दिवसात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता अनेक ठिकाणी आहे. त्यामुळे यलो अॅलर्टही देण्यात आला आहे, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे.