Raj Thackeray Exclusive : एकनाथ शिंदे टार्गेटवर आहेत का? राज ठाकरे ‘रोखठोक’ म्हणाले….
"पक्ष उभा करणं ही साधी गोष्ट नाही. चिन्ह आणि शिवसेना हे बाळासाहेबांनी तयार केलं आहे. तुमचे उद्धव ठाकरेंशी मतभेद असू शकतात, समजू शकतो. पण या गोष्टींची सवय लागली तर बघायला नको. राजकारणातील इथिक्स पाळली पाहिजे. नाहीतर पुढील राजकारण बकाल होईल", असं राज ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला विशेष मुलाखत दिली. ‘टीव्ही 9 मराठी’चे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी राज ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत राज ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवर मनमोकळेपणाने प्रतिक्रिया दिली. राज ठाकरे यांना यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभा निवडणुकीत टार्गेटवर आहेत का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. “असं नाही. तुम्ही माझ्या भाषेवर जाऊ नका. मला चिन्ह पळवलं, पक्ष फोडला ती गोष्ट आवडली नाही. कुणाच्या बाबत होऊ नये. पक्ष म्हणून तुम्हाला मतदारांनी मतदान केलं आहे. मतदान केल्यावर तुम्ही स्वत: निर्णय घेणार हे योग्य नाही. त्यात नाव आणि चिन्ह हे फारच झालं. शिवसेना, राष्ट्रवादीबाबत बोलता असं नाही. असं कुणाबाबत होऊ नये. कारण पक्ष उभा करणं ही साधी गोष्ट नाही. चिन्ह आणि शिवसेना हे बाळासाहेबांनी तयार केलं आहे. तुमचे उद्धव ठाकरेंशी मतभेद असू शकतात, समजू शकतो. पण या गोष्टींची सवय लागली तर बघायला नको. राजकारणातील इथिक्स पाळली पाहिजे. नाहीतर पुढील राजकारण बकाल होईल”, असं राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
“मी शरद पवारांवर बोलतो. उद्धव ठाकरेंवर बोलतो. भाषणात एक एक गोष्टी येत असतात. जी घडलेली गोष्ट नाही पटली ते सांगणं चुकीचं आहे. एखाद्या व्यक्तीमध्ये चुकीची गोष्ट झाली तर चुकीची म्हणणार. त्यात माझे त्यांचे संबंध बाधा येत नाही. उद्या माझी एखादी गोष्ट कुणाला नाही पटली. तर त्याने सांगितलं तर बिघडलं कुठे. फेअर”, असं राज ठाकरे म्हणाले.
‘त्यांनी गुड जेश्चरमध्ये पाठिंबा द्यायला हवा होता’
“आदित्य ठाकरेच्या बाबत मी केलं ते गुड जेश्चरमधून केलं. आमच्या घरातील व्यक्ती उभी होती. म्हणून त्यांना उमदेवार दिला नाही. लोकसभेला मी बिनशर्त पाठिंबा दिला. त्यात काही शर्त नव्हती. विधानसभेला पाठिंबा द्या असं सांगितलं नव्हतं. मी गुढीपाडव्याच्या सभेला सांगितलं मोदींना पाठिंबा देतोय. विधानसभेच्या कामाला लागा असं सांगितलं. तेव्हाच आम्ही स्वबळावर लढणार हे स्पष्ट झालं. त्यावेळी अमितचा विषय नव्हता”, असं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं.
“आठ दिवसापूर्वी अमितचं नाव आलं. त्यांनी उमेदवार देण नं देणं हे योग्य नाही. त्यांनी गुड जेश्चरमध्ये पाठिंबा द्यायला हवा होता. सरवणकर भेटायला आले. मी काय बोलू? केसरकर आले त्यांना मी काय सांग. उलट निर्णय त्यांनीच घ्यायचा होता. मी काही गोष्टी पाळत आलो याचा अर्थ कुणी पाळाव्या की नाही हे सांगू शकत नाही”, असं राज ठाकरे म्हणाले.
“चर्चा काय करायची. शिंदेंची ही पहिली निवडणूक आहे. माझी चौथी पाचवी आहे. शिंदे ज्या पक्षात होते तेव्हा ठाणे बघायचे. आज पहिल्यांदा ते निवडणूक लढत आहेत. चर्चा काय करायची. माझा विषय अमित नाहीच आहे. तुम्ही एका जागेवर का येता?”, असं राज ठाकरे म्हणाले.