उन्हाळ्यामुळे कोरोना वाढणार नाही, स्वयंशिस्त पाळली तरच कोरोनाची साथ नियंत्रणात येईल: टोपे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलेले 'मी जबाबदार' या सूत्राचे पालन केले पाहिजे. ते पाळण्यासाठी मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचा वापर बंधनकारक आहे. | Rajesh Tope
मुंबई: कोरोनाचा साथ वाढण्याचा वातावरणाशी कोणताही संबंध नाही. त्यामुळे उन्हाळ्यात कोरोना वाढणार नाही, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी स्पष्ट केले. कोरोनाची साथ पुन्हा नियंत्रणात आणायची असेल तर त्यावर स्वयंशिस्त हा एकच उपाय आहे, असेही टोपे यांनी सांगितले. (Coronavirus spread in Maharashtra)
ते बुधवारी मुंबईत ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते. यावेळी त्यांनी नागरिकांना कोरोनासंबर्धीचे नियम पाळण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलेले ‘मी जबाबदार’ या सूत्राचे पालन केले पाहिजे. ते पाळण्यासाठी मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचा वापर बंधनकारक आहे. कोरोनाची साथ स्वयंशिस्तीनेच आटोक्यात येईल, असे राजेश टोपे यांनी सांगितले.
राज्यात 9 हजार 927 नव्या कोरोना रुग्णांची वाढ, मुंबई, पुणे, नाशिकमधील स्थिती काय?
राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचं संकट अधिक गहिरं होत असल्याचं पाहायला मिळत आहे. देशात कोरोना रुग्ण सापडलेल्या घटनेला मंगळवारी बरोबर 1 वर्ष पूर्ण झालं. मधल्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. पण आता पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकारनं दिलेल्या सूचनेनुसार स्थानिक पातळीवर जिल्हा प्रशासनाकडून मोठे निर्णय घेण्यात येत आहेत.
राज्यातील मंगळवारी दिवसभरातील कोरोना रुग्णांची आकडेवारी पाहिली तर राज्यात गेल्या 24 तासांत 9 हजार 927 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 12 हजार 182 रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. सध्या राज्यात एकूण 95 हजार 322 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता 93.34 टक्क्यांवर पोहोचलं असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विटरवरुन दिली होती.
पुण्यात कोरोनाचा उद्रेक
पुण्यात मंगळवारी दिवसभरात कोरोनाचे 1 हजार 86 नवे रुग्ण आढळून आले आहेत. दिवसभरात 795 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर गेल्या 24 तासांत 11 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यातील 5 जण हे पुण्याबाहेरील आहे. सध्या पुण्यात 321 गंभीर स्वरुपाच्या रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
नाशिकमध्ये कोरोनाची काय स्थिती?
नाशिकमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शनिवार आणि रविवारी बाजारपेठा पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता शहरातील सर्व बाजारपेठा बंद ठेवण्यात येणार आहेत. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. इतकच नाही तर नाशिकमधील धार्मिक स्थळांबाबतही मोठा निर्णय घेण्यात आला आहे. शहरातील सर्व धार्मिक स्थळं सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंतच सुरु ठेवण्यात येणार आहेत. तसंच शनिवार आणि रविवारी सर्व धार्मिक स्थळं बंद ठेवण्यात येणार आहेत. शाळा, महाविद्यालय आणि खासगी कोचिंग क्लासेसही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
संबंधित बातम्या :
मुंबईत सध्या लॉकडाऊनची गरज नाही, पण…; महापालिका आयुक्तांनी दिला ‘हा’ इशारा
(Coronavirus spread in Maharashtra)