Shivsena: राक्षस, तडीपार गुंड.. अमित शाहांच्या दौऱ्यानंतर काय आहेत शिवसेना नेत्यांच्या प्रतिक्रिया? विभागप्रमुखांच्या बैठकीत उद्धव ठाकरे काय म्हणाले?
अमित शाहा यांनी केलेल्या टीकेचा शिवसेना नेत्यांनीही (Shivsena leaders)जोरदार समाचार घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांची ही बोलायची भाषा आहे का, असा सवाल मनिषा कायंदे यांनी उपस्थित केला आहे. तर चंद्रकांत खैरे यांनी अमित शाहा यांच्यावर राक्षस म्हणून टीका केली आहे. तर शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी अमित शाहा यांना तडीपार गुंड म्हटले आहे.
मुंबई – मुंबई महापालिका निवडणूक (BMC Election)एकनाथ शिंदे गट आणि भाजपा एकत्रित लढणार असून, मुंबईत 150 जागा मिळवण्याचे टार्गेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी राज्यातील भाजपा नेत्यांना दिले आहे. मुंबई दौऱ्यावर असलेल्या अमित शाहा (Amit Shah)यांनी भाजपा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावरही जोरदार घणाघात केला होता. उद्धव ठाकरे यांनी भाजपासोबत धोका केला असल्याचे सांगत, असा धोका सहन करु नका, असा सल्लाच त्यांनी भाजपा नेत्यांना दिला. मुंबईत भाजपाचेच वर्चस्व राहायला हवे, असेही त्यांनी यावेळी भाजपा नेत्यांना आवर्जून सांगितले. शिवसेनेची जी सध्याची स्थिती झाली आहे, ती भाजपामुळे झालेली नसून त्यांनी ती स्वताच्या हाताने ओढवून घेतल्याची टीकाही अमित शाहा यांनी केली आहे.
अमित शाहा यांनी केलेल्या टीकेचा शिवसेना नेत्यांनीही (Shivsena leaders)जोरदार समाचार घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांची ही बोलायची भाषा आहे का, असा सवाल मनिषा कायंदे यांनी उपस्थित केला आहे. तर चंद्रकांत खैरे यांनी अमित शाहा यांच्यावर राक्षस म्हणून टीका केली आहे. तर शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी अमित शाहा यांना तडीपार गुंड म्हटले आहे. तर शिवसेनेच्या आजच्या आढावा बैठकीत उद्धव ठाकरेंनी अमित शाहा यांचा नोमोल्लेखच टाळला, अशी माहिती शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.
अमित शाहा देशाचे गृहमंत्री, त्यांची भाषा अयोग्य- मनिषा कायंदे
अमित शहा यांनी भाजपा पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना जी भाषा वापरली ती योग्य नाही, अशी टीका शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी केली आहे. धडा शिकवणार, बदला घेणार ही वक्तव्ये शाहांना शोभत नाहीत, ते काही एका पार्टीचे नाहीत तर देशाचे गृहमंत्री आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे. त्यांची ही वक्तव्ये त्यांच्या पदाला न शोभणारी आहेत, असेही कायंदे म्हणाल्या होत्या. भाजप केवळ निवडणुका आल्यावरच कामाला लागतो, त्याआधी लोकांच्या समस्यांचे त्यांना काही देणेघेणे नसते, असा टोलाही त्यांना लगावला आहे. निवडणुका आल्या की त्यांची दुकानदारी सुरू होते, असा आरोपही त्यांनी केलाय. चंद्रकांत खैरे यांची अमित शहा यांच्यावर जहरी टीका
अमित शाहा राक्षस- चंद्रकांत खैरे
औरंगाबादचे शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनीही अमित शाहा यांच्यावर सडकून टीका केली आहे. अमित शहा यांचा राक्षस म्हणून उल्लेख खैरे यांनी केला आहे. अमित शहा राक्षसी वृत्तीने काम करत असल्याचा घणाघात चंद्रकांत खैरे यांनी केलाय.
तडीपार गुंडाचे ऐकण्याइतपत राज्याचे कान दुबळे नाहीत – सुषमा अंधारे
शिवसेना राहील की संपेल यावर जर तडीपार गुंड येऊन इथे मत मांडत असतील, तर महाराष्ट्राचे कान इतके दुबळे नाहीत. अशी टीका शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे. तुमचं ऐकायला महाराष्ट्र दुबळ्या आणि हलक्या मनाचा नक्कीच नाही, असा टोला त्यांनी अमित शाहा यांना लगावला आगे. महाराष्ट्रात तडीपार गुंडांचं म्हणणं ऐकलं जात नाही, असेही त्या पुढे म्हणाल्यात. इतकचं नाही तर नवनीत राणा, आशिष शेलार आणि राज ठाकरे हे अत्यंत प्रामाणिकपणे दिलेल्या सुपारीचे काम करत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
उद्धव ठाकरेंकडून नामोल्लेखही नाही
अमित शाहा यांच्या कालच्या दौऱ्यानंतर आज शिवसेनेची आढावा बैठक पार पडली. यात दसरा मेळाव्यासह, विभागांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत अमित शाहा यांच्याबाबत शिनसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उल्लेखही केला नाही, अशी माहिती शिवसेना नेत्या किशोरी पडणेकर यांनी दिली आहे. आजच्या बैठकीत केवळ कामांचा आढावा घेतला. अमित शाहा यांच्याबाबत ते एकही शब्द बोलले नाहीत, असेही त्यांनी सांगितले.